आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच प्रमुख पक्षांच्या पोटी बंडखोरांनी आणला गोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल 726 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यापैकी सुमारे 200 उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित उमेदवारांच्या पदरी मात्र निराशा पडणार आहे. त्यामुळे अनेकांकडून बंडखोरीचे अस्त्र वापरण्यात येणार आहे. उमेदवारांची यादी जाहीर होताच हे अस्त्र बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी होणार आहे.

महापालिकेच्या द्विसदस्यीय पद्धतीने होणार्‍या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवीन प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार 68 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे मनसुबे आहेत. त्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पाचही पक्षांकडून 68 जागांसाठी 726 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. एका पक्षाकडून निवडणूक लढवण्यास सरासरी 125 ते 150 उमेदवार इच्छुक आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात युती-आघाडीच्या निर्णयासह उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच अनेककांकडून बंडखोरीची भाषा केली जाणार आहे. काहीजण उघडपणे नाराजी व्यक्त करतील, तर काही पडद्याआड राहून विरोधकांना मदत करतील, असेच सध्याचे चित्र आहे. युती झाल्यास शिवसेनेकडे 36, तर भाजपकडे 32 जागा राहणार असल्याची शक्यता आहे. परंतु दोन्ही पक्षांकडून 315 जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना 247 उमेदवारांच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यातील बहुतेक उमेदवारांची मनधरणी करण्यात दोन्ही पक्षांना यश मिळेल, परंतु 60 ते 70 उमेदवार बंडखोरी करतील, त्यातील काहीजण, तर थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका शिवसेना-भाजपला बसणार आहे. याशिवाय अपक्ष उमेदवारांचेही आव्हान असणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचीही अशीच परिस्थिती आहे. दोन्ही पक्षांकडून 296 जणांनी उमेदवारी मागितली आहे. आघाडी झाल्यास दोन्ही पक्षांकडून केवळ 68 जणांना उमेदवारी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवारीसाठी डावलण्यात येणार्‍या उर्वरित 228 पैकी 40 ते 50 उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यातील काहीजण निवडणूकही लढवणार आहेत. युतीप्रमाणेच आघाडीलाही बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. चारही पक्षांतील बंडखोर उमेदवार पडद्याआड राहून विरोधकांना मदत करण्याची शक्यता आहे. इतर पक्षाकडून आतापर्यंत डावलण्यात आलेल्या अनेकांनी मनसेचा मार्ग स्वीकारला आहे. मनसेकडून 115 जणांनी उमेदवारी मागितली असली, तरी बंडखोरी करणार्‍यांचे प्रमाण कमी राहणार आहे. पक्षातील बंडखोरांसह राजकीय पक्षांसमोर अपक्षांचेही मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करताना सर्वच राजकीय पक्षांची दमछाक उडणार आहे. त्यामुळे बंडखोर व अपक्षांचा भाव चांगलाच वधारणार असल्याची चर्चा आहे.

विद्यमानांना दिले जाणार प्राधान्य
उमेदवारी देताना सर्वच पक्ष विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य देणार आहेत. विद्यमान नगरसेवकांचा विचार झाल्यानंतर उमेदवारीचा शब्द घेऊन इतर पक्षातून आलेल्यांचा विचार होईल. त्यानंतर एकनिष्ठांचा विचार होणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी नवीन चेहर्‍यांचा कितपत फायदा होईल, याबाबत शंका आहे.

युती-आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा
युती व आघाडी होणार, असे गृहीत धरून अनेकांनी मुलाखती दिल्या. प्रभागातील जागांचा हिशोब मांडत सोयीच्या जागेवर अनेकांनी हक्क सांगितला आहे. परंतु जागावाटप करताना ऐनवेळी कोणती जागा मित्रपक्षाला जाणार, याबाबत इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आघाडीला केडगावचा अडथळा
राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे व काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री (17 नोव्हेंबर) जागावाटपाबाबत बैठक झाली. बैठकीत 1 ते 30 पर्यंतच्या प्रभागामधील जागांवर सकारात्मक चर्चा झाली. परंतु केडगावमधील उर्वरित 4 प्रभागांमधील जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यासाठी दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे.