आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आघाडीची ‘सत्ता एक्स्प्रेस’ सुसाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ काँग्रेस व राष्ट्रवादीने पूर्ण केले आहे. सुरूवातीपासून आघाडीवर असलेल्या राष्ट्रवादीने 5 अपक्षांसह सर्वाधिक 23 उमेदवारांची सोमवारी गटनोंदणी केली. मित्रपक्ष काँग्रेस मंगळवारी (24 डिसेंबर) 11 उमेदवारांची गटनोंदणी करणार आहे. त्यानंतर आघाडीचे संख्याबळ 34 वर पोहचेल. शिवसेना-भाजप मात्र अपेक्षित संख्याबळापासून दूर आहेत. त्यामुळे आघाडीची ‘सत्ता एक्स्प्रेस’ सुसाट असून सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी सुरूवातीपासून आघाडीवर असलेल्या राष्ट्रवादीने 5 अपक्षांसह सर्वाधिक 23 उमेदवारांची गटनोंदणी करून पुन्हा बाजी मारली. काही झाले तरी महापालिकेत आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्ष काँग्रेसलाही राष्ट्रवादीने विश्वासात घेतले. एवढेच नाही, तर मनसेलाही बरोबर घेण्याची त्यांची व्यूहरचना यशस्वी झाली. त्यामुळेच सर्वाधिक अपक्ष राष्ट्रवादीच्या गळाला लागले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वाधिक 23 उमेदवारांची गटनोंदणी करून आघाडीच सत्ता स्थापन करणार असल्याचे राष्ट्रवादीने सोमवारी दाखवून दिले. काँग्रेसकडून मंगळवारी 11 उमेदवारांची गटनोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आघाडीचे संख्याबळ 34 वर पोहचेल.

सुरूवातीपासून बॅकफूटवर असलेल्या शिवसेनेला पुरस्कृत उमेदवार सचिन जाधव यांच्यासह केवळ 18 उमेदवारांची गटनोंदणी करता आली. भाजपने दोन पुरस्कृत उमेदवारांशिवाय केवळ 9 उमेदवारांची गटनोंदणी केली. त्यामुळे युतीचे संख्याबळ 27 झाले असले, तरी ते आघाडीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे महापालिकेत आघाडीच सत्ता स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मनसेचे 4 उमेदवारही आघाडीला साथ देण्याच्या तयारीत आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे होणार्‍या बैठकीत त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शिवाय गटनोंदणी न झालेले इतर तीन अपक्ष उमेदवारही आघाडीच्या सोबत असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ 41 वर पोहोचणार आहे.

आघाडीचे संख्याबळ पाहता अडीच वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. निवडणुकीच्या आधीपासून दोन्ही पक्ष आपसातील वादामुळे बॅकफूटवर होते. त्याचा सर्वात जास्त फटका भाजपला बसला. मागील निवडणुकीत 12 जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला देखील एक जागा गमवावी लागली. त्यामुळेच निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस दोन्ही पक्षांनी कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. त्यानंतर आमदार अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना ठाणे येथे सहलीला पाठवून सत्ता स्थापन करण्यासाठीची सुत्रे हाती घेतली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. राष्ट्रवादीने अपक्षांची जुळवाजुळव करत युतीला शह दिला. आपली सत्ता एक्स्प्रेस कशी सुसाट होती, हेच राष्ट्रवादीने युतीसह नगरकरांना दाखवून दिले.

जगताप पती-पत्नी महापौरपदाचे दावेदार
महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारपासून अर्जविक्री सुरू झाली. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, त्यांची पत्नी शीतल व मनसेचे किशोर डागवाले यांनी महापौरपदासाठी अर्ज घेतले. उपमहापौरपदासाठी मनसेचे गणेश भोसले यांनी अर्ज घेतला. त्यामुळे महापौर-उपमहापौरपदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट आहे.

शिवसेना-भाजप पुरस्कृत उमेदवारांचा पाठिंबा
भाजप पुरस्कृत उषा ठाणगे व सारिका भुतकर, तसेच शिवसेना पुरस्कृत नंदा कुलकर्णी यांची राष्ट्रवादीने गटनोंदणी केली नाही. परंतु या उमेदवारांचा आघाडीला पाठिंबा आहे. मनसेचे 4 उमेदवारही आघाडीच्या सत्तेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ 41 होणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते समद खान यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

शिवसेनेचे पदाधिकारी ‘स्विच ऑफ’
काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सोमवारी गटनोंदणी केली. कोणता पक्ष किती अपक्षांसह गटनोंदणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी, भाजप व मनसेने गटनोंदणीची माहिती दिली. परंतु बॅकफूटवर असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मात्र मोबाइल बंद ठेवले होते. आमदार अनिल राठोड यांना विचारले असता गटनोंदणी झाली, पण किती उमेदवारांची झाली, ते मला सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पुरस्कृत उमेदवारांशिवाय गटनोंदणी
शिवसेना-भाजपचे प्रत्येकी दोन असे चार पुरस्कृत उमेदवार होते. त्यात सचिन जाधव व नंदा कुलकर्णी (शिवसेना), तर उषा ठाणगे व सारिका भुतकर (भाजप) यांचा समावेश आहे. मात्र, शिवसेनेने केवळ सचिन जाधव यांच्यासह गटनोंदणी केली, तर भाजपला दोन्ही पुरस्कृतांशिवाय गटनोंदणी करावी लागली. चारही पुरस्कृत उमेदवार आमचे हक्काचे आहेत, असे आतापर्यंत ठणकावून सांगण्यात येत होते. मग, त्यांच्याशिवाय गटनोंदणी झालीच कशी?