आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीतील उमेदवारांचा प्रभागावर डोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रभाग अकरामधील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तर दुसरी जागा महिला उमेदवारासाठी राखीव आहे. मागास प्रवर्ग जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजिंक्य बोरकर, तर महिला राखीव जागेवर विद्यमान नगरसेविका इंदरकौर गंभीर निवडणूक लढवणार आहेत. गंभीर यांनी फारसी भरीव कामे केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा इच्छुक उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेविका संगीता खरमाळे यांच्या पूर्वीच्या प्रभागातील मोठा भाग प्रभाग आठमध्ये आला आहे. आठमधील एक जागा नागरिकांचा महिला मागास प्रवर्गासाठी, तर दुसरी जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने खरमाळे यांची अडचण झाली आहे. त्याचप्रमाणे पंधाडे यांचाही पूर्वीचा प्रभाग तुटला आहे. त्यामुळे दोन्ही विद्यमानांनी इतर प्रभागाची शोधाशोध करून प्रभाग 11 ला प्राधान्य दिले, अशी चर्चा आहे. खरमाळे यांनी, तर प्रभाग 8 व 11 मध्ये प्रचारही सुरू केला आहे. प्रभाग 11 मधून त्यांची उमेदवारी निश्चित झाली, तर इंदरकौर गंभीर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहील. शिवसेनेकडून पंधाडे व अशोक दहिफळे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या बोरकर यांचीही कोंडी होईल. याशिवाय मनसेकडून वैशाली मंगलारप यांचेही नाव चर्चेत आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांची पत्नी स्वाती कांबळे व जयंत येलूलकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. शिवसेना-भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळते, यावरच प्रभागातील लढत स्पष्ट होणार आहे.

प्रभागात भरीव कामे नाहीत
प्रभागात भरीव कामे न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेक वसाहतींत सांडपाणी रस्त्यावर आले आहे. नगरसेविका व मनपाकडे तक्रार करूनही ही समस्या सुटलेली नाही. निवडणुकीत नागरिक कोणाला कौल देतात, हे वेळ आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

डोळे उघडे ठेऊन काम करावे
आशा हाऊसिंग सोसायटी परिसरात ड्रेनेजची सुविधा नाही. पाणी वाहून जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नगरसेवक व मनपा प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे भावी नगरसेवकाने डोळे उघडे ठेवून काम करावे. हीच अपेक्षा’’ रंजना तवले, मतदार.

ओपनस्पेसचा बोजवारा
प्रत्येक वेळी स्वखर्चाने परिसर स्वच्छ करावा लागतो. रस्त्यावरील खुरट्या गवतामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. साफसफाईसाठी मनपाचे कर्मचारी येत नाहीत. भावी नगरसेवकाने समस्या सोडवणे गरजेचे आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी ओपनस्पेस विकसित करावेत.’’ अँड. संपत शिंदे, मतदार.

‘ते’ फक्त मत मागायलाच येतात
गेल्या चार वर्षांपासून घरामागे ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येते. साचलेल्या पाण्याची दुर्गंधी सहन करणे असह्य झाले आहे. नगरसेवक प्रत्येक वेळी मत मागण्यासाठी घरी येतात, पण समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.’’ अरुणा येरी, मतदार.

खेड्यातील रस्ते तरी बरे..
ग्रामीण भागात देखील आता काँक्रीटचे रस्ते पहायला मिळतात. परंतु महापालिका असलेल्या शहरात मात्र अजूनही धड रस्ते नाहीत. रस्त्यांची दुरवस्था पाहून आपण शहरात राहतो की, खेड्यात असा प्रश्न पडतो. सर्व कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागते, ही शोकांतिका आहे.’’ रामचंद्र हिरे, मतदार.

जनतेचे प्रश्न सोडवू
प्रभागात पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आतापर्यंतच्या नगरसेवकांनी केवळ आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक मला साथ देतील, याची खात्री आहे. मनसेकडून उमेदवारी मागितली आहे. प्रभागातील जनसंपर्काचा फायदा होईल.’’ वैशाली मंगलारप, इच्छुक उमेदवार.

जनतेसाठी उमेदवारी
नगरसेवक हा केवळ प्रभागाचा नसतो, तो संपूर्ण शहराचे प्रतिनिधीत्व करत असतो. महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे करण्याची संधी त्याच्यासमोर उपलब्ध असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. नगरपालिका असताना दोन वेळा निवडून आलो. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली. आताच्या प्रभाग 11 चे त्यावेळी मी प्रतिनिधीत्व केले होते.’’ जयंत येलूलकर, इच्छुक उमेदवार.