आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकरी मनपाची; चाकरी जिल्हाधिकार्‍यांची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सध्या दुधात प्रचंड भेसळ होते. त्यामुळे त्याचा कोणालाही भरवसा वाटत नाही. भाजीपाल्यावरही प्रचंड कीटकनाशके फवारली जातात. असा भाजीपाला खाल्ला, तर जिल्ह्याचे मायबाप असलेले जिल्हाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होणार नाही का? त्यांनी त्यावर उपाय शोधला आहे. तो म्हणजे स्वत:च भाजीपाला पिकवण्याचा. त्यांच्या सरकारी बंगल्याच्या आवारात अगदी वर्षभर ताजा भाजीपाला पिकवला जातो. तो पिकवण्याचे काम मात्र करताहेत महापालिकेचे कर्मचारी! दुधासाठी एक गायही पाळण्यात आली आहे. तिचे दूध काढण्याचे काम मनपाचाच एक कर्मचारी करतो. गेल्या 17 वर्षांपासून हे कर्मचारी जिल्हाधिकार्‍यांच्या घरची चाकरी करत आहेत. वेतन मनपाचे व काम मात्र काहीही संबंध नसताना जिल्हाधिकार्‍यांच्या घरचे, असा हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या दादागिरीतून सुरू आहे.

नगरच्या महापालिकेच्या कारभाराचे नेहमीच धिंडवडे निघत असतात. एकीकडे शहरात कचर्‍याचे ढीग साचलेत. ते काढायला कर्मचारी नाहीत. उद्यानांची देखभाल करायला कर्मचारी नाहीत. बागा ओसाड पडल्या आहेत. वृक्षारोपण करण्यासाठीही माणसे नाहीत. अशा वेळी मनपाचे नऊ कर्मचारी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या इतर अधिकार्‍यांच्या बंगल्यांत आपली ‘सेवा’ बजावत आहेत. ‘आंधळा दळतो अन् कुत्रा पीठ खातो’ असा हा प्रकार आहे. त्यातील तीन कर्मचारी फक्त जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानातील बागेत काम करतात. त्यात एक महिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्याच्या परिसरात भाजीपाल्याचा मळा फुलला आहे. हा मळा फुलवण्यात मनपा कर्मचार्‍यांचेच र्शम लागले आहेत. तेथील ताजा भाजीपाला दररोज जिल्हाधिकार्‍यांच्या स्वयंपाकघरात शिजतो. मनपाच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी एकनाथ गायकवाड हा भाजीपाला पिकवतात. ते अतिशय अनुभवी आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी पाळलेल्या गायीचे दूधही तेच काढतात. त्यामुळे त्यांना सुटी मिळत नाही. ते मूळचे पिंपळगाव माळवीचे रहिवासी असले, तरी त्यांना कायम येथेच राहावे लागते. जिल्हाधिकार्‍यांना सेंद्रिय भाजीपाला व शुद्ध दूध पुरवणारे गायकवाड मात्र आवारातील पत्र्याच्या खोपटात राहतात. गेल्या 17 वर्षांपासून त्यांनी अनेक जिल्हाधिकार्‍यांची सेवा केली आहे. त्यांच्या मदतीला मनपाच्या बांधकाम विभागातील कर्मचारी सुभद्रा भांबरकरही तितक्याच वर्षांपासून येथे काम करत आहेत. जिल्हाधिकार्‍यांचे आवार झाडण्याचे काम मनपाचाच एक कर्मचारी करतो. मनपाच्या कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या घरी काम करावे, असा कोणताही नियम नाही. त्यातल्या त्यात अशा प्रकारचे घरगड्याचे काम मनपाच्या कर्मचार्‍यांकडून कोणीच करवून घेऊ शकत नाही. तरीही हे सर्व अनेक वर्षांपासून सुरू आहे. मनपाचे कर्मचारी बहुतांशी मनपाच्या उद्यान व बांधकाम विभागातील आहेत.

मनपाच्या विभागप्रमुखांत या प्रकाराबाबत मोठी नाराजी आहे, पण वरिष्ठ अधिकारीच याकडे दुर्लक्ष करत असल्याने ते काहीही करू शकत नाहीत. विषय थेट जिल्हाधिकार्‍यांशी संबंधित असल्याने कोणीही उघड बोलत नाही. यातील वाईट बाब अशी, की जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांच्या घरची कामे करणारे काही कर्मचारी मनपाच्या अधिकार्‍यांनाही जुमानत नसल्याची माहिती समजली. (पूर्वार्ध)

जिल्हाधिकार्‍यांचे ‘नरो वा कुंजरो वा..’
जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याकडे घरकाम करत असलेल्या मनपा कर्मचार्‍यांची माहिती विचारली असता, त्यांनी प्रथम कानावर हात ठेवले. उलट, असे कोणते कर्मचारी आहेत, त्यांची नावे तुम्हीच सांगा, असा प्रतिप्रश्न त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला केला. नावे सांगण्यास सुरुवात केल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी ‘मी मीटिंगमध्ये आहे, नंतर फोन करतो,’ असे सांगत घाईघाईत फोनच बंद केला.

मनपाचे अधिकारी हतबल
जिल्हाप्रशानाच्या अधिकार्‍यांच्या घरी काम करणार्‍या कर्मचार्‍यांना परत बोलावण्यासाठी मनपातील विभागप्रमुखांनी अनेकदा प्रयत्न केले. पण जिल्हा प्रशासनाकडे निधीसंदर्भात कामे असतात. त्यात अडथळा येऊ नये, म्हणून याकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला मनपाचे अधिकारीच विभागप्रमुखांना देतात, असे एका विभागप्रमुखाने सांगितले. काही वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, आम्ही काहीही बोलू शकत नाही. कृपया आम्हाला यात ओढू नका, असे आर्जवही त्यांनी केले.

‘जिल्हा प्रशासना’कडे काम करणारे मनपा कर्मचारी
जिल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान : एकनाथ माधव गायकवाड, सुभद्रा रामभाऊ भांबरकर, साहेबराव बोरगे
इतर अधिकार्‍यांच्या घरी काम करणारे कर्मचारी :सुभाष देवढे, अंतोन पाटोळे, इंदूमती हजारे, अशोक साळुंके, लालू दुटे.