आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या घरीही गुलामी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी उपलब्ध कर्मचार्‍यांच्या कामाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, मनपाच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी केवळ रजिस्टरमध्ये सही करण्यापुरतेच कार्यालयात येतात. काम न करता पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम नागरी सेवेवर झाला आहे. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांच्या या सावळ्या गोंधळात मनपाचे अधिकारी व पदाधिकारीही सामील आहेत. त्यांनी काही कर्मचार्‍यांना स्वत:च्या घरी घरकामाला लावले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ही ‘परंपरा’ बिनदिक्कत सुरू आहे. सध्या महापालिकेत 2 हजार 307 कर्मचारी असून त्यापैकी 400 ते 450 कर्मचारी केवळ सही करण्यासाठीच कार्यालयात येतात. 40 ते 50 कर्मचारी हे अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात काम करतात. कर्मचारी नाहीत, कर्मचारी काम करत नाहीत अशी ओरड करणार्‍या अधिकारी व पदाधिकार्‍यांनीच कर्मचार्‍यांची पळवापळवी सुरू केली आहे. या कर्मचार्‍यांना जनतेच्या पैशांतून पगार द्यायचा अन् चाकरी मात्र स्वत:च्या घरी करून घ्यायची असा प्रकार सध्या सुरू आहे.

ही परंपरा यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी सुरू केली असून ती सध्या सुरूच आहे. त्यात केवळ अधिकारी व पदाधिकारीच नाहीत, तर नगरसेवक व मनपाचे काही अभियंतेही सामील आहेत. त्यांच्या घरी राबणार्‍या कर्मचार्‍यांना आपली नोकरी टिकवण्यासाठी सांगेल ते काम करावे लागते. मनपाकडे सध्या वर्ग चारमधील 1 हजार 806 कर्मचारी असून 196 कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. मात्र, शहराचा विस्तार पाहता आणखी 500 ते 600 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. असे असतानाही अधिकारी व पदाधिकार्‍यांनी मनपाच्या कर्मचार्‍यांना खासगी कामाला लावून नगरकरांशी द्रोह केला आहे.

‘दिव्य मराठी’ टीमने बुधवारी दिवसभर विविध ठिकाणी पाहणी करून अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक व राजकीय पक्षाच्या कार्यालयांमध्ये काम करणार्‍या मनपा कर्मचार्‍यांचा आढावा घेतला. ‘दिव्य मराठी’ची टीम आल्याचे लक्षात येताच अनेक कर्मचार्‍यांनी पळ काढला, तर काहींनी आमच्या नोकरीचा प्रश्न असल्याचे सांगत नाव न छापण्याची विनंती केली. ‘दिव्य मराठी’ने मात्र अधिकारी व पदाधिकार्‍यांचे खरे रुप नगरकरांसमोर ठेवले आहे.

तातडीने कारवाई करावी
मनपाकडे कर्मचार्‍यांची आधीच वानवा आहे. अशा स्थितीत अधिकारी व आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या घरी कर्मचार्‍यांना राबवले जाते. उपलब्ध कर्मचार्‍यांच्या कामाचे योग्य नियोजन झाले, तर अनेक नागरी समस्या सुटतील. मनपा कर्मचार्‍यांच्या पगारावर मोठय़ा प्रमाणात खर्च होतो, तो जनतेच्या पैशांतूनच करण्यात येतो. त्यामुळे प्रशासनाने आपले कर्मचारी कोठे काम करतात, कोणाच्या आदेशानुसार काम करतात याचा तपास घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी.’’ विनित पाऊलबुधे, विरोधी पक्षनेता


राजकारण्यांच्या घरीही गुलामी
अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या घरी राबणार्‍या काही कर्मचार्‍यांची नावे उदाहरणादाखल देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र शहरातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी मनपाचे कर्मचारी अनेक वर्षांपासून राबत आहेत. त्यात आमदार अरुण जगताप, भानुदास कोतकर, शंकरराव घुले यांच्यासह अनेक राजकीय पुढार्‍यांचा समावेश आहे.

तीव्र आंदोलन करणार
महापालिकेचा पगार घेणारे कर्मचारी घरकामासाठी राबवणे हा नगरकरांशी एक प्रकारचा द्रोह आहे. नगरकरांच्या पैशांची ही थेट लूट उघडकीस आणल्याबद्दल ‘दिव्य मराठी’स धन्यवाद. नगरच्या जनतेने आतातरी जागरूक होऊन लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून ही लूटमार थांबवावी. लोकप्रतिनिधींनीही जबाबदारीने आत्मपरीक्षण करून महापालिकेचे कर्मचारी परत करण्याची गरज आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.’’ प्रमोद मोहोळे, अध्यक्ष, सन्मानीय नागरिक प्रतिष्ठान

माहिती घेऊन कार्यवाही करू
अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या घरी मनपा कर्मचार्‍यांनी काम करणे हे चुकीचेच आहे. असे किती कर्मचारी आहेत याबाबत माहिती घेण्यात येत आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच सर्व संबंधित कर्मचार्‍यांना महापालिकेच्या सेवेत पुन्हा बोलवून घेण्यात येईल. ’’ विजय कुलकर्णी, आयुक्त