आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Issue At Nagar, Divya Marathi

मनपा देणार बुरुडगावला पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका हद्दीतून वगळलेल्या बुरुडगावला आठवड्यातून एकदा पिण्याचे पाणी देण्यास महापालिका प्रशासनाने तयारी दाखवली आहे. आमदार अनिल राठोड यांनी बुरुडगावच्या ग्रामस्थांसह आयुक्त विजय कुलकर्णी यांची मंगळवारी (22 जुलै) भेट घेऊन पाणीप्रश्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

बुरुडगावमध्ये मागील तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सन 1999 च्या हद्दवाढीत बुरुडगावचा समावेश केल्यानंतर महापालिका अस्तित्त्वात आली होती. परंतु राजकीय कुरघोड्यांमुळे 2011 मध्ये बुरुडगाव ग्रामस्थांनी महापालिका हद्दीतून आपला भाग वगळून घेतला. त्यामुळे महापालिकेने बुरुडगावचे पाणी बंद केले होते.कचरा डेपो व सीना नदीत सोडण्यात येणा-या शहराच्या सांडपाण्यामुळे बुरुडगाव परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ विविध आजारांना बळी पडले आहेत.

महापालिकेकडून पाणी मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु ग्रामस्थांना अद्याप महापालिकेचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे आमदार राठोड यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी आयुक्त कुलकर्णी यांची भेट घेऊन पाणीप्रश्नाबाबत चर्चा केली. बुरुडगावमधील एकूण नळजोड व थकबाकी तपासून आठवड्यातून एक दिवस पाणी देण्यास आयुक्तांनी तयारी दाखवली. त्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुखांना दिले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, नगरसेवक विक्रम राठोड, बुरुडगावचे ग्रामस्थ संजय पाचारणे, बाळासाहेब रकटे, अरुण शिंदे, श्याम पटवेकर, जालिंदर कुलट, राधाकिसन कुलट, ज्ञानदेव जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान, नगर शहरालाच सध्या पाणी कमी पडत आहे. बुरूडगावला पाणी दिल्याने नवे संकट उभे राहणार आहे.