आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - महापालिकेत सत्ता कोण स्थापन करणार? यावर सोमवारी (30 डिसेंबर) सकाळी होणार्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब होईल. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या उपस्थितीत ही निवड होणार आहे. पुरेसे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. परंतु ऐनवेळी चमत्कार होऊन पुन्हा युतीची सत्ता येईल, अशी आशा शिवसेनेच्या पदाधिकार्यांना आहे.
महापालिका निवडणुकीत नगरकरांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार? तसेच महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, महापालिकेत आघाडीच सत्ता स्थापन करणार हे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने महापौरपदासाठी संग्राम जगताप यांचे, तर काँग्रेसने उपमहापौरपदासाठी सुवर्णा कोतकर यांचे नाव जाहीर केले. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणार्या संख्याबळाची जुळवाजुळव पूर्ण झाल्याचा दावाही आघाडीने केला.
दरम्यान, युतीनेही सत्ता स्थापन करण्याची आशा शेवटपर्यंत सोडलेली नाही. त्यामुळेच शिवसेनेचे अनिल शिंदे व भाजपचे बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला. ऐनवेळी काही गडबड होऊ नये, यासाठी वाकळे यांनी उपमहापौरपदासाठीही अर्ज भरला आहे. शिवसेनेच्या दीपाली बारस्कर यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या नवीन सभागृहात होणार्या सभेत महापौर-उपमहापौर निवडले जातील. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार पीठासीन अधिकारी म्हणून काम करतील. सभा सुरू झाल्यानंतर दोन्ही पदांसाठी भरण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल. वैध उमेदवारांची नावे वाचून दाखवल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ देण्यात येईल. महापौर-उपमहापौरपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज असल्यास पीठासीन अधिकार्यांच्या सूचनेनुसार हात उंचावून मतदान होईल. या निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
पक्षीय बलाबल
जिंकलेल्या जागा गटनोंदणी
- शिवसेना - 17 18
- भाजप - 09 09
- राष्ट्रवादी - 18 23
- काँग्रेस - 11 10
- मनसे - 04 04
- अपक्ष - 09 -
- एकूण - 68 64
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.