आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Mayor Selection Politics Nagar

मनसेचा कौल आघाडीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अपक्षांचे संख्याबळ जुळल्याने आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार नगरसेवकांचे महत्त्व कमी झाले आहे. सत्ताधार्‍यांबरोबर जाण्याचे संकेत मनसेकडून मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा आघाडीला पाठिंबा निश्चित मानला जात आहे. संपर्कप्रमुख संतोष धुरी गुरुवारी रात्री नगरला आले असून शुक्रवारी मनसेचा कौल ते जाहीर करणार आहेत.

सत्तेचे पारडे दोलायमान असताना मनसेच्या चार नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झाले होते. युती व आघाडीच्या पुरस्कृतांमुळे मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. मात्र, युतीचे पुरस्कृत आपल्या गोटात खेचण्यात आघाडीला यश आले. त्यामुळे मनसेशिवाय आघाडीचे सत्तेचे गणित जुळले. सत्तेच्या बाजूने कौल देण्याचे संकेत सुरुवातीला मनसेकडून देण्यात आले. मात्र, निर्णय घेण्यास विलंब झाल्याने आघाडीला पाठिंबा देऊनही मनसेची सत्तेची झोळी रिकामीच राहणार आहे. महापौरपद राष्ट्रवादीकडे, तर काँग्रेसकडे उपमहापौरपद अशी वाटणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे असलेले स्थायी समितीचे सभापतिपद अपक्षांची मोट बांधणार्‍या प्रबळ अपक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौर्‍याच्या वेळी त्यांच्या मोटारीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिंगारमध्ये दगडफेक केली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले. याच कारणाने मनसे आघाडीच्या बाजूने जाणार नसल्याचा दावा मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून करण्यात येत होता. मात्र, मनसे आघाडीच्याच बाजूने जाणार असल्याचे संकेत असून शुक्रवारी धुरी यांच्याकडून यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.