आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Mayor Selection Politics Nagar

महापौरपदासाठी काँग्रेस आघाडीचा एक, तर युतीकडून दोन अर्ज दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली महापालिकेतील रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे. चार दिवसांनी नव्या महापौरांची निवड होईल. महापौरपदासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा एक, तर शिवसेना-भाजप युतीचे दोन अर्ज गुरुवारी दाखल झाले. संख्याबळाची जुळवाजुळव झाल्याने आघाडीचे पारडे जड झाले असले, तरी युतीकडून सत्ता स्थापन करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे 30 डिसेंबरला होणार्‍या महापौरपदाच्या निवडणुकीकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या 34 प्रभागांतील 67 जागांसाठी 16 डिसेंबरला मतदान झाले. नगरकरांनी कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने मागील दहा दिवसांपासून सत्तेचा तिढा सुरू आहे. सर्वाधिक 29 जागा मिळवणार्‍या आघाडीने अपक्षांना बरोबर घेत सत्ता स्थापण्याचा दावा केला. त्यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी संग्राम जगताप यांचे, तर काँग्रेसने उपमहापौरपदासाठी सुवर्णा कोतकर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे महापालिकेत आघाडीच सत्ता स्थापणार हे स्पष्ट झाले आहे.

जगताप व कोतकर यांनी आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. युतीकडूनही दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यात आले आहेत. शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी महापौरपदासाठी, तर दीपाली बारस्कर यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे यांनीही दोन्ही पदांसाठी अर्ज भरल्याने युतीचे सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. आघाडीने आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, शंकरराव घुले, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा आदींच्या उपस्थितीत महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले. शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी मात्र अर्ज दाखल करताना हजर नव्हते. त्यात शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांचाही समावेश आहे. महापौर-उपमहापौरपदाची निवड येत्या 30 डिसेंबरला होणार आहे. महापौर कोण होणार हे गुरुवारी स्पष्ट झाले, तरी या निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या चार दिवसांनी महापौरांची निवड होऊन सत्ता स्थापन होईल.

आघाडीचे नगरसेवक सहलीला रवाना
सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे, परंतु ऐनवेळी काही गडबड होऊ नये, यासाठी नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात आले आहे. काहींना पुण्याला तर काहींना अन्यत्र पाठविण्यात आले आहे. 30 डिसेंबरला हे सर्व निवडणुकीसाठी परततील. गटनोंदणी करण्यापूर्वी शिवसेनेनेही आपल्या नगरसेवकांना ठाण्याला सहलीला पाठवले होते.

( फोटो : आघाडीतर्फे संग्राम जगताप व सुवर्णा कोतकर यांनी अनुक्रमे महापौर, उपमहापौर पदासाठी गुरुवारी अर्ज दाखल केले. या वेळी आमदार अरुण जगताप यांच्यासह आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. छाया : कल्पक हतवळणे )