आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी स्वावलंबी बनणे आवश्यक : शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाजातील अन्याय, अत्याचार सहन करून शोषित महिलांचे जीवन उपेक्षित बनले आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन देहव्यापारात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. देहव्यापारासाठी कोणतीही स्त्री स्वत:हून पुढाकार घेत नाही, तर तिला समाज मजबूर करतो. त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय देहव्यापार करणार्‍या महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत. या महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन महापौर शीला शिंदे यांनी केले.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने देहव्यापार करणार्‍या महिलांना शिवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महापौर शिंदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महिलांच्या प्रश्नांसाठी समाजप्रबोधन होणे आवश्यक आहे. महिलांनीही स्वत:हून पुढे येऊन आपले प्रश्न मांडायला हवेत. या वेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती किरण उनवणे, उपसभापती मालन ढोणे, उपमहापौर गीतांजली काळे, स्नेहालयाचे सचिव राजीव गुजर व देहव्यापार करणार्‍या महिला उपस्थित होत्या.

उनवणे म्हणाल्या, देहव्यापारातील महिलांनी सामाजिक भीतीपोटी खोटी नावे दिली होती. त्यामुळे खर्‍या गरजू महिलांपर्यंत पोहोचून त्यांना योजनेचा लाभ करून देणे अवघड होते. गुजर म्हणाले, महापालिकेने शिवणयंत्र देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चित मदत होईल. या कार्यक्रमासाठी ‘स्नेहज्योत’चे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण मुत्याल, समुपदेशक यशवंत कुरापट्टी, क्षेत्रीय अधिकारी बाबासाहेब सांगळे, वैजनाथ लोहार, दीपक बुरम आदी प्रयत्नशील होते.