आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बससेवेचा मार्ग मोकळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहर बससेवेची (एएमटी) ठेकेदार संस्था ‘प्रसन्ना पर्पल’ला बसडेपोचे आतापर्यंतचे जागाभाडे देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. दरमहा 60 हजारप्रमाणे 15 लाख रुपये संस्थेला देण्यात येणार आहेत. बससेवेच्या नफा-तोट्याची तपासणी करून नुकसान भरपाई देण्याबाबत दोन महिन्यांनी निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्या दोन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे एएमटी मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, बसडेपोसाठी आतापर्यंत जागा उपलब्ध करून देता आली नाही, अशी खंत आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सभेत व्यक्त केली.

महापौर शीला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहर बससेवेच्या अडचणींबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मोठय़ा प्रमाणात तोटा सहन करावा लागत असल्याने एएमटी व्यवस्थापनाने 30 जूनपासून सेवा बंद केली होती. मात्र, अडचणींबाबत सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. त्यानुसार गुरुवारच्या सभेत बससेवेच्या अडचणींबाबत चर्चा झाली.

सुरुवातीला नगरसेवक बाळासाहेब बोराटे व किशोर डागवाले यांनी एएमटीला येत असलेल्या तोट्याबाबत प्रशासनाने माहिती घेतली का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त कुलकर्णी म्हणाले, नगरसह पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारख्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच तोट्यात असते, परंतु नागरिकांच्या सोयीसाठी नफा-तोट्याचा विचार न करता सेवा सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सभागृहाने योग्य निर्णय घ्यावा. करारनाम्यानुसार प्रशासनाला बसडेपोसाठी जागा उपलब्ध करून देता आली नाही, परंतु आता जागेचा प्रश्न तातडीने सोडवणार आहे. माळीवाडा बसस्थानकाच्या मागील जागा लवकरच बस उभ्या करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, शहर बससेवेला होणारा तोटा लक्षात घेऊन ठेकेदार संस्थेला आतापर्यंतचे डेपोच्या जागेचे भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर बससेवेला होणार्‍या नफा-तोट्याची तपासणी करण्यासाठी मनपाचे यंत्र अभियंता परिमल निकम व मुख्य लेखापरीक्षक डी. डी. मेर्शाम यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडून बससेवेच्या आर्थिक नुकसानीचा अहवाल आल्यावर दोन महिन्यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

नगरसेवक निखिल वारे यांनी शहरातील अनधिकृत रिक्षांचा प्रश्न उपस्थित केला. महापौर वगळता कोणीही जिल्हा प्रशासनाकडे अनधिकृत रिक्षांवरील कारवाईबाबत पाठपुरावा केला नाही. मनपा प्रशासनालादेखील याबाबत गांभीर्य नाही. मात्र, यापुढे प्रशासनाने सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन जिल्हा प्रशासनाकडे अनधिकृत रिक्षांवरील कारवाईबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु तो महापालिकेचा विषय नाही, असे म्हणत काही नगरसेवकांनी वारे यांच्या मागणीला विरोध केला.

केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत सावेडी, केडगाव व सारसनगर एकत्रित भुयारी गटार योजनेच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली, तसेच शहर व केडगाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी ‘एचडीपीई’ पाइप्स वापरणे, शहर वाहतूक आराखडा तयार करणे, भिंगार येथील महापालिकेची मोकळी जागा एकता एज्यूकेशन सोसायटीला क्रीडांगणासाठी देणे आदी विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

शहरात 5-6 हजार रिक्षाचालक असून त्यांच्या रोजीरोटीसाठी मनसे खंबीरपणे उभी राहणार असल्याचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी सांगितले. त्यावर सचिन पारखी म्हणाले, मनसेने नगरकरांचाही विचार करावा. अंबादास पंधाडे म्हणाले, रिक्षाचालकांच्या राजकीय पक्ष संघटना आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे.

‘पारगमन’बाबत सर्व पक्ष एकत्र
पारगमन कर संकलित करणार्‍या ठेकेदार संस्थेच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. ठेकेदार मात्र राजकीय पक्ष व विविध संघटना खंडणी मागत असल्याचा आरोप करतो. नाक्यावर ट्रकचालकांना मारहाण केली जाते. तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या संस्थेचा ठेका आठ दिवसांत रद्द करा, अशी मागणी संग्राम जगताप, निखिल वारे, बाळासाहेब बोराटे, बाळासाहेब पवार, संभाजी कदम आदी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. मात्र, करारनाम्यानुसार ठेका रद्द करताना कायदेशीर बाबी तपासून सबळ कारण द्यावे लागेल, तसेच ठेकेदार संस्थेचे म्हणणे ऐकून घ्यावे लागणार आहे. पुणे रस्त्यावरील नाक्यावर झालेल्या घटनेबाबत ठेकेदार संस्थेला तीन दिवसांत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. ठेका रद्द करण्याबाबत प्रस्ताव तयार करू, असे आयुक्तांनी सांगितले.

नगरसचिवांनी व्यक्त केली दिलगिरी
सभेतील चर्चेचे इतिवृत्त लिहिण्यासाठी स्टेनोग्राफर असणे आवश्यक आहे. परंतु गुरुवारी इतिवृत्त लिहिणारे कर्मचारी रजेवर असल्यामुळे सभेचे इतिवृत्त कोण लिहिणार, असा प्रश्न उपस्थित करत संग्राम जगताप यांनी आयुक्त, महापौर व नगरसचिव मिलिंद वैद्य यांना चांगलेच धारेवर धरले. इतिवृत्त लिहिणारे कर्मचारी नसल्याने सभागृहाचा अपमान झाला आहे. त्यामुळे रजेवर गेलेल्या कर्मचार्‍यांसह नगरसचिवांवर कारवाई करा, अशी मागणी जगताप यांच्यासह बाळासाहेब बोराटे, निखिल वारे, किशोर डागवाले आदी नगरसेवकांनी लावून धरली. या गोंधळामुळे सत्ताधारी नगरसेवकही निरूत्तर झाले. शेवटी इतिवृत्त लिहिण्यासाठी पर्यायी कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर, तसेच नगरसचिवांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली.

सभेचा निर्णय समाधानकारक
बसडेपोसाठी जागा उपलब्ध करून द्यावी; अथवा जागाभाडे द्यावे अशी सुरुवातीपासून मागणी होती. परंतु आतापर्यंतचे जागाभाडे देण्याचा समाधानकारक निर्णय गुरुवारच्या सभेत घेण्यात आला. आर्थिक तोट्यामुळे चालू महिन्यात कर्मचार्‍यांना केवळ 50 टक्के पगार देण्याची वेळ संस्थेवर आली. मात्र, जागाभाडे मिळाल्याने बससेवेचा तोटा काही प्रमाणात कमी होणार असल्याने नगरकरांना अधिक चांगली व सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न करू.’’ दीपक मगर, शहर व्यवस्थापक, एएमटी.