आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation News In Marathi, Nagar Municipal Corporation Economic Budget Issue

यंदा नगर महापालिकेचा जमा-खर्चाचा ताळमेळ जुळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेच्या जमा-खर्चात मोठी तफावत निर्माण झाल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. उत्पन्नाचा मोठा हिस्सा कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होत असून विविध विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 20 फेब्रुवारीपर्यंत सभेसमोर सादर न झाल्याने त्यात कोणतीही करवाढ करता येणार नाही. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षातही जमा-खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी प्रशासनासह पदाधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागेल.

एलबीटी, मालमत्ता कर व पारगमन हे महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. त्यातून महिन्याकाठी सरासरी चार ते साडेचार कोटी रुपये जमा होतात. परंतु ही सर्व रक्कम महापालिका कर्मचार्‍यांचे पगार व पेन्शनवर खर्च होते. दर महिन्याला कर्मचार्‍यांच्या पगारावर 4 कोटी 40 लाख, तर पेन्शवर 1 कोटी 35 लाख रुपये खर्च होतात. याशिवाय शहर पाणी योजना व शहरातील पथदिव्यांच्या वीलबिलावर सुमारे दोन कोटी, तर वाहनभाडे, टेलिफोन बिल, झेरॉक्स आदी कामांसाठी महिन्याला सुमारे 20 लाख रुपये खर्च होतात. त्यामुळे मनपाचे जमा-खर्चाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शासकीय योजनांच्या जोरावर शहरात काही विकासकामे सुरू असली, तरी त्यात स्व:हिस्सा भरण्यासाठी निधी नसल्याने अनेक कामे अर्धवट आहेत. त्यात नगरोत्थान योजनेसह शहर पाणी योजनेचा समावेश आहे. विशेष म्हणजे शहर सुधारित पाणीपुरवठा व नगरोत्थान योजनेचा स्व:हिस्सा भरण्यासाठी मनपाला हुडकोकडे कर्जासाठी प्रस्ताव पाठवावा लागला.

यावरून मनपाची आर्थिक स्थिती स्पष्ट होते. वर्षभरापूर्वी कर्मचार्‍यांना दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार मिळत होता. परंतु आता हाच पगार 25 तारखेनंतर दिला जातो. कामगार संघटनेला वारंवार आंदोलने करावी लागतात, तेव्हा कुठे पगार मिळतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठा खर्च करून नवीन नगरसेवक मनपात दाखल झाले. परंतु मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने त्यांचा हिरमोड होणार आहे. महापौर संग्राम जगताप यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. परंतु योजना मंजूर झाल्या तरी, स्व:हिश्याची रक्कम कशी भरणार, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.