आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - काँग्रेसमधील अंतर्गत वाद व मनसेच्या अस्पष्ट भूमिकेमुळे आघाडीच्या ‘सत्ता एक्स्प्रेस’ला मंगळवारी रेड सिग्नल मिळाला. गटनेतापदावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पदासाठी डावलल्याने काँग्रेसचे दीप चव्हाण यांनी गटनोंदणीकडे पाठ फिरवली. मनसेच्या मुंबईत झालेल्या बैठकीत आघाडीच्या बाजूने कोणताच स्पष्ट कौल मिळाला नाही. शिवाय काँग्रेसच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या विरोधात पवित्रा घेतला. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आतापर्यंत आघाडीवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने सुरूवातीपासून आघाडी घेतली. बाळासाहेब बोराटे यांची बिनविरोध निवड, निवडणुकीत सर्वाधिक 18 जागांवरील विजय, तसेच सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव यात राष्ट्रवादीने बाजी मारली. मित्रपक्ष काँग्रेस मात्र राष्ट्रवादीपासून अजूनही अलिप्त आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवली. परंतु काँग्रेसच्या सहा जागा स्वबळावर जिंकणार्या संदीप कोतकर यांच्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोतकर यांनी सत्तेत महत्त्वाच्या पदाची मागणी केली असल्याची चर्चा आहे. त्यावर पक्षपातळीवर तोडगा काढण्यात येणार आहे. परंतु त्यापूर्वी कोतकर यांना मिळालेल्या गटनेतापदामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेसचे प्रभारी पक्षनिरीक्षक आमदार शरद रणपिसे, जयंत ससाणे, आमदार डॉ. सुधीर तांबे आदींच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत दीप चव्हाण यांनी गटनेतापदावर दावा केला. परंतु संदीप कोतकर यांनाच गटनेता करावे, अशी मागणी समोर आल्याने नाराज झालेले चव्हाण बैठक सोडून निघून गेले. बैठकीला उपस्थित असलेले नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या. काहींनी तर राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी व्हायचे नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. बैठक सोडून गेलेल्या चव्हाण यांनी मंगळवारी नाशिक येथे झालेल्या पक्षाच्या गटनोंदणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे काँग्रेसला 11 पैकी केवळ 10 नगरसेवकांची गटनोंदणी करता आली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी मात्र सर्व 11 जणांची गटनोंदणी झाली असल्याचे सांगितले. पक्षाच्या पदाधिकार्यांनी गटनोंदणीबाबत कोणतीच पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे गटनोंदणीबाबत मला काहीच माहिती नसल्याचे चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.
डागवाले-भोसलेंचा सत्तेकडे कल
मनसेचे 4 नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी यांची मंगळवारी दुपारी मुंबई येथे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज ठाकरे यांनी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. चारही नगरसेवकांनी युती व आघाडीची सद्य परिस्थिती ठाकरे यांना सांगितली. सत्तेत सहभागी झालो, तर प्रभागातील विकासकामे मार्गी लागतील. नागरिकांनी आम्हाला मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले, त्यामुळे सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका किशोर डागवाले व गणेश भोसले यांनी ठाकरे यांच्यासमोर मांडली. बैठकीला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांच्यासह जिल्हासंघटक सचिन डफळ, वसंत लोढा, सतीश मैड, संजय झिंजे, सुमित वर्मा आदी उपस्थित होते.
काँग्रेसला हवंय उपमहापौर व सभापतिपद
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बुधवारी बैठक होणार आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत यावेळी चर्चा होईल. काँग्रेसला उपमहापौर व स्थायी समितीचे सभापतिपद हवे आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका मांडली. या बैठकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
आघाडीचे संख्याबळ 33 वर पोहोचले
राष्ट्रवादीने सोमवारी 5 अपक्षांसह 23 उमेदवारांची गटनोंदणी केली, तर काँग्रेसने मंगळवारी 10 उमेदवारांची गटनोंदणी केली. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ 33 वर पोहोचले आहे. काँग्रेसचे दीप चव्हाण यांनी गटनोंदणीकडे पाठ फिरवल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीला आणखी दोन उमेदवारांची आवश्यकता आहे. मनसेची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आघाडी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे.
भाजप पदाधिकार्यांचे धाबे दणाणले
काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणार्या पक्षातील पदाधिकार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मग तो खासदार असो अथवा आमदार, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला. शहरातील भाजप पदाधिकार्यांनी दोन पुरस्कृत उमेदवारांना बरोबर न घेता गटनोंदणी केली. त्यामुळे फडणवीस यांच्या इशार्याने भाजप पंच कमेटीचे धाबे दणाणले आहे.
पाठिंब्याबाबत आज निर्णय अपेक्षित
मनसे उमेदवारांसह स्थानिक पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. त्याबाबत गटनेते बाळा नांदगावकर यांच्याकडे निर्णय कळवला जाईल, असे ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा अथवा बुधवारी नांदगावकर यांच्यामार्फत पक्षप्रमुखांचा अंतिम निर्णय कळेल. त्यानंतरच कुणाला पाठिंबा द्यायचा ते निश्चित होईल.’’ सचिन डफळ, जिल्हा संघटक, मनसे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.