आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन्यथा पाठिंबा काढून घेऊ; वसंत लोढा यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आघाडीच्या ‘सत्ता एक्स्प्रेस’ला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार नगरसेवकांच्या भूमिकेला वरिष्ठांनी शुक्रवारी अधिकृतपणे दुजोरा दिला. परंतु, हा पाठिंबा केवळ विकासाच्या मुद्द्यावरच दिलेला आहे. आघाडीने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही, तर मनसे आपला पाठिंबा मागे घेईल, अशी ग्वाही पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ पूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. अपक्ष व मनसेच्या मदतीशिवाय सत्तास्थापना करणे अवघड असल्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. परंतु, मनसेने आपली भूमिका स्पष्ट करण्यास बराच वेळ घेतला. त्यामुळे मनसेत नगरसेवक व पदाधिकारी यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चेला पेव फुटले. शुक्रवारी मनसेने घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा संघटक सचिन डफळ व महिलाअध्यक्षा अनिता दिघे वगळता इतर पदाधिकारी गैरहजर होते. याबाबत मनसेचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्याशी संपर्क साधला असता, आपण लग्नसमारंभासाठी श्रीरामपूरला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या चारही नगरसेवकांचे मत विचारात घेऊन शहर विकासाच्या मुद्द्यावरच मनसेने आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असा पुनरुच्चार त्यांनी केला. आघाडीने शहरातील पाणीपुरवठा, भुयारी गटारयोजना, उपनगरातील विकासकामे, नवीन उद्योग आणण्याची आश्वासने दिलेली आहेत. म्हणून आघाडीसोबत जाण्याचा आमचा निर्णय आहे. त्यांनी आश्वासनांची पूर्ती केली नाही, तर पाठिंबा मागे घेऊ, अशी ग्वाही लोढा यांनी‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग झाला मोकळा
महापालिकेत सत्तास्थापन करण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसेने शुक्रवारी पाठिंबा जाहीर केल्याने 30 डिसेंबरच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट झाले. अपक्षांच्या साथीने आघाडीने बहुमताचे गणित जुळवले होते. मनसेने अधिकृत भूमिका जाहीर करण्यापूर्वीच आघाडीने मनसेचा पाठिंबा गृहीत धरला होता. तसे जाहीरही करण्यात आले. शुक्रवारी मनसेकडून पाठिंब्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बहुमतासाठी आघाडीला 35 जागांची आवश्यकता आहे.

अपक्षांच्या सहकार्याने आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यात आता मनसेच्या चार जागांची भर पडली आहे. मनसेच्या पाठिंब्याने आघाडीने चाळीसच्या जवळपास मजल मारली आहे. तर युतीने संघर्ष करण्याचे प्रयत्नही सोडून दिले आहेत. युतीचे पुरस्कृतही आघाडीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे महापौरपदी संग्राम जगताप व उपमहापौरपदी सुवर्णा कोतकर यांची निवड निश्चित मानली जात आहे.