आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाने दणाणली महापालिका, पगारासह विविध मागण्यांसाठी काम बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवत शुक्रवारी आंदोलन केले. थकीत पगार, निवृत्तीवेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत सर्व कर्मचार्‍यांनी कार्यालय अक्षरश: डोक्यावर घेतले.

कामगार नेते अनंत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता कामगारांनी महापालिका कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दरवाजासमोर ठिय्या दिला. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऑगस्ट महिना अर्धा संपत आला, तरी जुलैचे वेतन निवृत्तीवेतन अद्याप मिळाले नसल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. कर्मचारी सेवानिवृत्तांना दरमहा १० तारखेच्या आत वेतन पेन्शन अदा करण्यात यावी, आराेग्य सफाई विभागातील कर्मचार्‍यांना गणवेश, तसेच आवश्यक संरक्षक साहित्य उपलब्ध करून द्यावे, कचरा वाहतुकीसाठी पुरेशी वाहने उपलब्ध करून द्यावीत, नादुरुस्त गाड्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील द्यावा, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर १०० ते १५० सफाई कामगारांना नाशिकला पाठवण्याची सुरु असलेली कार्यवाही तत्काळ रद्द करावी, सर्व कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती, बढती, सहाव्या वेतन आयोगाचा फरक इतर देयके अदा करावीत, कामगार संघटना मनपा प्रशासनातील संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, मे, गोकुळाष्टमी, वाल्मिक जयंतीला कामगारांना हक्काची सुटी मिळावी, कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात थांबण्याची बेकायदेशीर सक्ती बंद करावी, मनपाने दैनंदिन कामाच्या नियोजनासाठी दिलेल्या मोबाइल वापराची वेळ ठरवून द्यावी अशा विविध मागण्या कर्मचार्‍यांनी केल्या.

मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला. मात्र, दुपारी आयुक्त विलास ढगे इतर अधिकार्‍यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वेतन निवृत्तीवेतन देण्यासाठी जुळवाजुळव सुरु झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अचानक भेटी देऊन सफाईच्या ठिकाणी कामगारांना अवमानास्पद बोलण्याचा आरोप असलेले अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना समज देण्याचे आश्वासन आंदोलकांना मिळाले. वालगुडे यांच्याकडून झालेली सफाई कामगारांवरील कारवाई मागे घेण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. पदोन्नती इतर प्रलंबित मागण्यांसाठी २१ ऑगस्टला आयुक्तांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कामगार नेते अनंत लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आंदोलनात लोखंडेंसह आनंद वायकर, बाबासाहेब मुदगल, सूर्यभान देवघडे, पाशा शेख, गुलाब गाडे, अय्युब शेख, विठ्ठल उमाप, राधाजी सोनवणे, बाळासाहेब विधाटे, भिवसेन घोरपडे आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आजही सफाई नाही
कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे शुक्रवारी शहरात साफसफाई होऊ शकली नव्हती. स्वातंत्र्यदिनाची हक्काची सुटी घेण्याचा निर्धार महापालिका कामगार संघटनेने घेतला असून १५ ऑगस्टला साफसफाई करणार नसल्याचे कामगार नेते लोखंडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात सलग दोन दिवस सफाई होऊ शकणार नाही.

अभियानावर बहिष्कार
सफाई कामगार विनावेतन राबत असताना पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना या कामगारांची भेट घेऊन त्यांची व्यथा समजून घेण्याची गरज वाटली नाही. त्यामुळेच संघटनेने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील स्वच्छतेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. संबंधितांकडून स्वच्छतेच्या नावावर केवळ स्टंटबाजी करण्यात येत आहे.'' - कॉम्रेड अनंत लोखंडे, अध्यक्ष,मनपा कामगार युनियन.