आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Worker Diwali Bonus Demand Nagar

..तर काम बंद करू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिवाळीपूर्वी 20 टक्के बोनस, 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान, तसेच विशेष सर्वसाधारण सभा घेऊन 811 कोर्ट कर्मचार्‍यांचा स्थायी पदांवर समायोजनाचा ठराव मंजूर करावा या मागण्यांसाठी महापालिका कर्मचार्‍यांनी गुरुवारपासून धरणे आंदोलन सुरू केले. मागण्यांबाबत तातडीने निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

दिवाळीचा सण वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु मनपा प्रशासनाने यंदाही कर्मचार्‍यांच्या दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत कार्यवाही केलेली नाही. यामुळे कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळपासून मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मनपा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे मागण्यांबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. आकृतिबंधास मंजुरी देऊन 811 कोर्ट कर्मचार्‍यांचे स्थायी पदांवर समायोजन करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करावा, अशी संघटनेची मागणी आहे. आकृतिबंधाचा प्रस्ताव यापूर्वीच सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत महापौरांशी चर्चाही झालेली आहे. ठरावाला मंजुरी देण्यासाठी तातडीने महासभा बोलावण्यात येईल, असे आश्वासन महापौर शीला शिंदे यांनी दिले होते. मात्र, 15 ऑक्टोबरला होणार्‍या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर संघटनेच्या मागण्यांबाबत विषय ठेवण्यात आलेला नाही. यामुळे संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेतला नाही, तर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, नंदू डहाणे, विजय बोधे आदींचा सहभाग होता.

आयुक्तांनी अहवाल मागवला
संघटनेतर्फे दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, प्रशासनाने संघटना पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलावले नाही. शुक्रवारपासून काम बंद आंदोलनाचा संघटनेने इशारा दिल्यानंतर आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सायंकाळी संघटनेच्या कार्यालयात फॅक्सद्वारे पत्र दिले. मनपाच्या आर्थिक परिस्थितीबाबत मुख्य लेखाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला असल्याचे आयुक्तांनी त्यात म्हटले आहे.