आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांच्या ‘गुलामी’बाबत सर्वांचीच मिठाची गुळणी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेचे अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या घरी, तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये काम करणार्‍या मनपा कर्मचार्‍यांच्या गुलामीबाबत सर्वांनीच ‘अळी मिळी गुपचिळी’ची भूमिका घेतली आहे. गुरूवारच्या मनपा सभेत एकाही अधिकारी किंवा पदाधिकार्‍याने आपल्या घरी राबणारे मनपाचे कर्मचारी परत पाठवण्याबाबत निर्णय घेतला नाही. सर्व पक्षातील नेत्यांची भूमिका ‘आपण सर्व भाऊ, मिळून मनपाला वाटून खाऊ’ अशीच असल्याची तिखट प्रतिक्रिया सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोहळे यांनी व्यक्त केली.

अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या घरी गुलामी करणार्‍या मनपा कर्मचार्‍यांचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने गुरूवारी नावानिशी प्रसिध्द केल्यानंतर शहरात खळबळ उडाली. परखड व वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिध्द केल्याने ‘दिव्य मराठी’चे अभिनंदन केले. दरम्यान, एरवी सर्वसाधारण सभेत किरकोळ विषयावरून प्रशासनाला कोंडीत पकडणार्‍या नगरसेवकांनी गुरूवारच्या सभेत मात्र गुलामी करणार्‍या कर्मचार्‍यांबाबत शब्दही उच्चारला नाही.

सर्वांचेच हात दगडाखाली असल्याने गुलामी करणार्‍या कर्मचार्‍यांबाबत बोलणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाचे कर्मचारी आणखी कोणाच्या घरी काम करतात, याबाबत अनेक नागरिकांनी माहिती दिली. माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर संग्राम जगताप, संदीप कोतकर या सर्वांकडे सुमारे 50 ते 100 कर्मचारी काम करतात. त्यापैकी निम्मे कर्मचारी कोतकरांच्या घरासह त्यांची अनेक हॉटेल्स व म्हशीच्या गोठय़ात काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. केडगाव ग्रामपंचायत असतानाचे व नंतर मनपात समाविष्ट झालेले 250 कर्मचारी आज कोठे काम करतात, याचा तपास प्रशासनालाही नाही. त्यामुळे अधिकारी व आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या घरी राबणार्‍या मनपा कर्मचार्‍यांची संख्या आणखी वाढली आहे.