आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदय रुग्णालयावरील कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जीवामहाले (प्रेमदान चौक)चौकातील नवोदय रुग्णालयाचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की शिवीगाळ करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला. रुग्णालयाचा परवाना रद्द करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. आयुक्त घन:श्याम मंगळे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, धक्काबुक्की शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींशी संबंध नसल्याचे नवोदय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पार्कींगखाऊ रुग्णालयांच्या विरोधात महापालिकेने सुरू असलेल्या कारवाईला सोमवारी वेगळेच वळण लागले. अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे हे कर्मचाऱ्यांसह नवोदय रुग्णालयाचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेले. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी काही तासांची मुदत मागितली, त्यांच्या मागणीनुसार मुदत देण्यात आली. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली, रुग्णालयाच्या ओपीडीचा भाग जेसीबी मशीनने पाडण्यात आला. 
 
दरम्यान, कारवाई सुरू असतानाच अचानक तीन अज्ञात व्यक्तींनी कारवाईस विरोध करत इथापे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ सुरू केली. रुग्णालयात आमचे रुग्ण आहेत, त्यामुळे कारवाई करू नका, असे या अज्ञात व्यक्तींचे म्हणणे होते. इथापे इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, कारवाईस विरोध करण्याचा तुकाचा काय संबंध, कुठे आहेत तुमचे रूग्ण, अशी िवचारणाही या व्यक्तींना करण्यात आली. परंतु त्यांनी शिवीगाळ सुरूच ठेवली, त्यामुळे संतापलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई बंद करत थेट रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले. नोबल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर, सिटीकेअरचे डॉ. संदीप सुराणा, प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे आदी घटनास्थळी दाखल झाले. आयुक्त मंगळे यांनी देखील घटनास्थळी येऊन ठिय्या आंदाेलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

रुग्णालये स्वत:च पाडताहेत बांधकामे 
बेकायदा बांधकामे पाडण्याची महापालिकेची कार्यवाही सुरू आहे. रुग्णालयांनी आपली बेकायदा बांधकामे स्वत:च पाडून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार अनेक रुग्णालये आपली बेकायदा बांधकामे स्वत:च पाडून घेत आहेत. महापालिकेने त्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी देखील वैद्यकीय व्यावसायिक महापालिकेकडे करत आहेत. दरम्यान, मंगळवारपासून पोलिस बंदोबस्तात पुन्हा करवाई सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. 

१८ रुग्णालयांची बांधकामे पाडली 
औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे शहरातील १४२ रुग्णालयांची बेकायदा बांधकामे महापालिकेच्या रडारवर आहेत. पहिल्या टप्प्यात ५२ रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असून त्यापैकी १८ रुग्णालयांची बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. नव्याने १३ रुग्णालयांना देखील कारवाईसाठी नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कारवाईचा अहवाल पुढील सुनावणीला न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालयांच्या विरोधात ही कारवाई सुरू आहे. 

कार्यवाहीचे अादेश 
मनपाकर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्की शिवीगाळ प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्त मंगळे यांनी सायंकाळी संघटनेने पदाधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. पनवोदय रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त मंगळे यांनी या बैठकीत दिले. 
बातम्या आणखी आहेत...