नगर- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांचे नगरसेवक सध्या मग्न आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे त्यांची पाठ फिरली आहे. महापालिका निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडणारे हे नगरसेवक गेल्या नऊ महिन्यांपासून प्रभागात न दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
महापालिकेत शिवसेनेचे 17 , राष्ट्रवादीचे 18, काँग्रेसचे 11 , भाजपचे 9, मनसेचे 4, अपक्ष 9, स्वीकृत 5 असे एकूण 73 नगरसेवक आहेत. एका प्रभागात दोन नगरसेवक असून ते सध्या निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत. प्रभागात पिण्याचे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, साफसफाई यासारखे प्रश्न गंभीर आहेत, ते सोडवण्यासाठी एकही नगरसेवक सध्या महापालिकेत फिरकत नाही. अधिकारी व कर्मचारीही नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. सर्वच नगरसेवक सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत प्रचार करतात, तर दुपारच्या मोकळ्या वेळेत विश्रांती घेतात. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. महिनाभरापूर्वी शहरात पसरलेली काविळीची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही. अनेक भागात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. निवडणूक लढवणारे उमेदवार सकाळ होताच मते मागायला दारात येत असल्याने नागरिकांची करमणूक होत असली, तरी समस्या मात्र आहे तशाच आहेत. नगरसेवकही अमुक उमेदवारालाच मते द्या, म्हणून नागरिकांना वेठीस धरत आहेत. नागरिक समस्यांबाबत बोलायला गेले, तर निवडणूक होऊ द्या, मग पाहू, असे सांगून नगरसेवक मोकळे होतात.
उमेदवारही सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत नागरिकांना आश्वासने देत आहेत. समस्या सोडवण्यासाठी मात्र कोणीच पुढे येत नाही. महापालिकेची निवडणूक होऊन नऊ महिने झाले, परंतु या कालावधीत नगरसेवकांनी
आपल्या प्रभागात एकही भरीव काम केलेले नाही. काही नगरसेवक, तर अद्याप प्रभागात फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.