आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांनी ठोकले बांधकाम विभागाला टाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंते व कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी बांधकाम विभागाला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली. उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मनपा निवडणूक जवळ आल्याने प्रभागातील विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वच नगरसेवकांची लगबग सुरू आहे. मनपाच्या बांधकाम विभागातील अभियंते व कर्मचारी कार्यालयात हजर राहत राहत नसल्याने नगरसेवकांची कामे खोळंबली आहेत. मंगळवारी काही नगरसेवक कामानिमित्त बांधकाम विभागात गेले असता शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी रजेवर गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. इतर अधिकारी व कर्मचारीही हजर नव्हते. बांधकाम विभागात 20 कर्मचारी कार्यरत असताना केवळ पाच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी बांधकाम विभागाला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर उपायुक्त डॉ. डोईफोडे यांच्या दालनात आंदोलन सुरू केले. यावेळी माजी महापौर संग्राम जगताप, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, संजय गाडे, अरविंद शिंदे, सुनील काळे, जितू गंभीर, उबेद शेख, बाबासाहेब गाडळकर आदी उपस्थित होते. सर्व अभियंते व कर्मचार्‍यांना दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे लेखी आदेश आयुक्तांशी चर्चा करून काढण्यात येतील, असे लेखी आश्वासन डोईफोडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.