आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corproation Employee Issue Sovle In Nagar

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न सुटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रशासन कामगार संघटना यांच्यात बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना लिपिक पदावर पदोन्नती देणे, वेतन आयोगाचा लाभ देणे अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन उपायुक्त अजय चारठाणकर यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले.

महापालिका आस्थापना विभागाने कर्मचार्‍यांच्या बदल्या पदोन्नतीचे प्रस्ताव उपायुक्त चारठाणकर यांच्याकडे सादर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांचे प्रश्न, अडीअडचणी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी चारठाणकर यांनी कामगार संघटनेची बैठक बोलावली होती. बैठकीत संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, आयुब शेख, विठ्ठल उमाप, अकिल सय्यद, राधाजी सोनवणे, विजय बोधे यांच्यासह आस्थापना विभागप्रमुख अंबादास सोनवणे, सहायक आयुक्त अशोक साबळे आदी उपस्थित होते. मनपाच्या सेवेत १२ १४ वर्षे सेवा, तसेच वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या ७६ कोर्ट वारस कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, वारस निर्णयानुसार चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना लिपिक पदावर बढती देणे आदी विषयांबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात निवड समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.

पात्र कर्मचार्‍यांच्या बढतीचा प्रस्ताव देखील निवड समितीसमोर ठेवून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच जानेवारी ते ३१ डिसेंबर १९८६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना चौथा, पाचवा सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दीड वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. एकूण ७६ लाख रुपयांच्या देयकांपैकी मयत झालेल्या १७ कर्मचार्‍यांचे ३४ लाख रुपयांची देयके मे २०१५ अखेर त्यांच्या कुटुंबांना देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. वैद्यकीय प्रतिपूर्तीचे ४० लाख रुपयांची देयके कामगारांना देणे असून त्यापैकी १५ लाख रुपयांची रक्कम मेअखेर देण्यात येणार आहेत. उर्वरित देयके जून २०१५ पर्यंत देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करावयाच्या रकमा, तसेच कामगारांनी भविष्य निर्वाह निधीतून मागणी केलेली उचल रकमांची कर्जप्रकरणे यापोटी एकूण ६५ लाख रुपयांची देयके अदा करण्यात आल्याचे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले.

फरकाच्या रकमेचे मासिक हप्ते केले निश्चित
मनपाप्रशासन कामगार संघटना यांच्या मागील महिन्यात झालेल्या बैठकीत कामगारांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या एकूण फरकाच्या रकमेचे मासिक हप्ते निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार शक्य झाल्यास मे महिन्याच्या अखेरीस दोन हप्ते कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. २००६-०९ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचा शेवटचा हप्ता देण्याबाबतही शक्य तितक्या लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रशासनाचे आभार
मनपा प्रशासनाने बैठकीत कामगारांच्या िहत जोपासत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कामगारांच्या अडचणी दूर होणार आहेत. प्रशासनाने कामगारांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. बदल्या पदोन्नतीबाबत निवड समिती निर्णय घेणार आहे.'' अनंतलोखंडे, अध्यक्ष, कामगार संघटना, मनपा.