आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा शास्तीमाफी, शास्तीची रक्कम ५३ कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा शास्तीमाफीचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत तीन टप्प्यांत ही सवलत मिळणार आहे. मात्र, या निर्णयाने मनपाला तब्बल ५३ कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत वेळोवेळी शास्तीमाफी देऊनही अपेक्षित वसुली झाली नसल्याची कबुली देत प्रशासनाने पुन्हा शास्तीमाफीचा निर्णय घेतला.
शहरातील मालमत्ताधारकांकडे मनपाचे तब्बल १२९ कोटी ७१ लाख रुपये थकीत आहेत. त्यात शास्तीची रक्कम ५३ कोटी ६१ लाख आहे. वेळोवेळी वसुली मोहीम राबवूनही अपेक्षित वसुली होत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. गेल्या पाच वर्षात मनपा प्रशासनाने अनेकदा शास्तीमाफी दिली. जानेवारी २०१५ मध्ये शास्तीमाफी देऊनही मनपाच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम जमा झाली नाही. असे असताना पुन्हा सहा महिन्यांनंतर शास्तीमाफीचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना ७५ टक्के, ३१ आॅक्टोबरपर्यंत ५० टक्के, तर ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास २५ टक्के शास्तीमाफी मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी मनपाला मात्र तब्बल ५३ कोटींचा फटका बसणार आहे.

अपेक्षित वसुली होत नसल्याने शास्तीच्या रकमेत दरवर्षी वाढ होत आहे. शास्तीमाफीची सवय झाल्याने थकबाकीदार पैसे भरण्यास तयार नाहीत. आज ना उद्या शास्ती माफ होईल, मग पाहू, अशी थकबाकीदारांची भूमिका आहे. विशेष म्हणजे त्यात बड्या थकबाकीदारांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्य नगरकर प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरतात, बडे थकबाकीदार मात्र जप्तीच्या नोटिसा मिळूनही पैसे भरत नाहीत. मनपा प्रशासनानेदेखील आतापर्यंत एकाही बड्या थकबाकीदाराची मालमत्ता जप्त केलेली नाही. त्यामुळे वसुली मोहीम राबवूनही मनपाची तिजोरी नेहमीच रिकामी राहते. आता पुन्हा एकदा शास्तीमाफी मिळाल्याने थकबाकीदार सुखावले आहेत. आयुक्त विलास ढगे यांनी त्यांच्या अधिकारात शास्तीमाफीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत वारंवार शास्तीमाफी देऊनही अपेक्षित वसुली झाली नसल्याचे त्यांनी हा निर्णय जाहीर करताना स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा शास्तीमाफी मिळूनही अपेक्षित वसुली होणार का, याबाबत शंकाच आहे.

विचार करूनच निर्णय
शास्तीमाफ करावी, अशी थकबाकीदारांची मागणी होती. नगरसेवकांनीदेखील तसा पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी तीन टप्प्यांत शास्तीमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सवलतीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त थकबाकीदारांनी पैसे भरावेत.'' अभिषेक कळमकर, महापौर.

अशी मिळेल शास्तीमाफी
३०सप्टेंबरपर्यंत : ७५ %
३१ ऑक्टोबरपर्यंत : ५० %
३० नोव्हेंबरपर्यंत : २५ %

५० जणांकडे १५ कोटी थकीत
दहालाखांपेक्षा अधिक रक्कम असलेले पन्नासपेक्षा अधिक बडे थकबाकीदार आहेत. त्यात शासकीय कार्यालये, शैक्षणिक धार्मिक संस्था, उद्योजक, व्यावसायिक, तसेच सर्वसामान्य नागरिक आहेत. या सर्वांकडे तब्बल १५ कोटींची थकबाकी आहे. त्यांना शास्तीमाफीची पर्वणी मिळाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह बड्या थकबाकीदारांनी सवलतीचा फायदा घेत थकबाकी भरली, तर मनपाची तिजोरी भरण्यास मोठी मदत होईल. मात्र, सवलत देऊनही निर्ढावलेल्या थकबाकीदारांनी पैसे भरले नाहीत, तर मनपासमोरील आर्थिक संकट कायम राहणार आहे.

कर भरणाऱ्यांकडे दुर्लक्ष
मनपाप्रशासनाने शास्तीमाफी देऊन थकबाकीदारांना मोठा दिलासा दिला. ३१ मार्च २०१६ अखेरच्या थकबाकीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. त्यात चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर नियमित भरणाऱ्यांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे थकबाकीदार सुखावले असले, तरी नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे.