आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीचा बडगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील व्यावसायिक थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर आहेत. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी थकबाकी वसुलीसाठी जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. चारही प्रभाग अधिकारी, तसेच वसुली अधिकाऱ्यांची त्यांनी साेमवारी झाडाझडती घेतली. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यावसायिक थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. कारवाईच्या भीतीने थकबाकीदारांनी पहिल्याच दिवशी ११ लाखांची थकबाकी जमा केली.
उपायुक्त (कर) भालचंद्र बेहेरे दीर्घरजेवर गेल्याने त्यांचा पदभार उपायुक्त (सामान्य) चारठाणकर यांच्याकडे आहे. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यावसायिक थकबाकीदारांच्या मालमत्तांना सील ठोकण्याचे आदेश त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. चारठाणकर यांनी सोमवारी प्रभाग अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जप्तीची कारवाई करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी केली. झेंडीगेट प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या अशोका हॉटेलच्या मालकाकडून पाच लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. अन्य काही ठिकाणीही अशीच कारवाई करण्यात आली.

जप्ती मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ११ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली. मोहीम अशीच सुरू राहणार असून व्यावसायिक थकबाकीदारांकडून वसुली करण्यात येणार आहे. दररोज ५० थकबाकीदारांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य थकबाकीदारांवर मात्र या मोहिमेंतर्गत कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे उपायुक्त चारठाणकर यांनी स्पष्ट केले. मनपा प्रशासनाने थेट जप्तीची कारवाई हाती घेतल्याने व्यावसायिक थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यातच खमके अधिकारी म्हणून आेळख असणाऱ्या चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई होत असल्याने अनेकांनी कारवाईपूर्वीच थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...