आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७१ नगरसेवकांचा वाढणार "भाव', इच्छुक उमेदवारांकडून नगरसेवकांच्या भेटगाठी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या ७३ पैकी ७१ नगरसेवकांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. लोकसभा, विधानसभा, दोन महापौर निवडणुका, आताची विधान परिषद सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीमुळे या नगरसेवकांचा "भाव' चांगलाच वाढणार आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांची मते निर्णायक ठरणार असल्याने राजकीय नेते इच्छुक उमेदवार या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेत आहेत. या निवडणुकीत मोठा घोडाबाजार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेसाठी येत्या २७ डिसेंबरला मतदान आहे. मावळते आमदार अरुण जगताप यांच्याजागी आपली वर्णी लावण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मनपाचे लोकांमधून निवडून आलेले ६६ स्वीकृत नगरसेवक या निवडणुकीत मतदार आहेत. नगरसेवक अजिंक्य बोरकर अनिता भोसले यांचे जातपडताळणी प्रमाणपत्राचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार त्यांना महापौर विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. उर्वरित ७१ नगरसेवकांची मते विधान परिषद निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

महापालिकेत सध्या काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मावळते आमदार जगताप हे विधान परिषदेवर अपक्ष निवडून आले असले, तरी सध्या ते राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादीला आली, तर त्यात मनपा नगरसेवकांची भूमिका मोलाची ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन महापौर निवडणुकांमध्ये जवळपास सर्वच नगरसेवक घोडेबाजारात उतरले होते. सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीतही हा घोडेबाजार पहायला मिळणार आहे. परंतु त्यापूर्वीच या नगरसेवकांना विधान परिषद निवडणुकीची संधी चालून आली.

विधान परिषदेच्या या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यापैकी अनेकांनी नगरसेवकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. एका बड्या राजकीय नेत्याने, तर दिवाळीचे अौचित्य साधून सर्व नगरसेवकांना आकर्षक भेट दिल्याची चर्चा आहे. त्यावरूनच विधान परिषद निवडणुकीत या नगरसेवकांचे "मोल' किती वाढणार हे स्पष्ट होते.

कामांना आचारसंहितेचा फटका
महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे पूर्ण होतील. या काळात नगरसेवकांना लोकसभा, विधानसभा, महापौर आताच्या विधान परिषद निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे विकासकामे करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, या निवडणुकांमध्ये अनेक नगरसेवकांनी स्वत:चे "मोल' वाढवून आपला विकास साधून घेतला.

पक्षीय बलाबल १८
राष्ट्रवादी ११
काँग्रेस १७
शिवसेना ०९
भाजप ०४
मनसे ०९
अपक्ष ०५
स्वीकृत ७३

नगरसेवकांचा काय दोष?
^तत्कालीन महापौरसंग्राम जगताप आमदार झाल्यामुळे महापौरपदाची निवडणूक झाली. सहा महिन्यांनंतर होणारी महापौर निवडणूक क्रमप्राप्त आहे. अन्य निवडणुकाही क्रमप्राप्त होत्या. त्यात नगरसेवकांचा काय दोष? मतदान करणे एवढेच आमच्या हातात आहे.'' दीप चव्हाण, ज्येष्ठनगरसेवक.