आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीच्या नवीन सदस्य निवडीला गुरुवारचा मुहूर्त, सभापतिपदासाठी अनेकांची फिल्डिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या गुरूवारी (१२ फेब्रुवारी) विशेष सभा बोलावण्यात आली अाहे. स्थायीचे सभापती किशोर डागवाले यांच्यासह आठ सदस्य सोडत पध्दतीने निवृत्त झाले आहेत. नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या विशेष सभेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. सदस्य निवडीनंतर सभापतीची निवड होणार असून त्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे.

स्थायी समितीच्या मागील सभेत सभापती डागवाले यांच्यासह आठ सदस्य निवृत्त झाले. त्यात सर्वाधिक शिवसेना-भाजप सदस्यांचा समावेश आहे. गुरूवारी होणाऱ्या विशेष सभेत या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक पक्षाचे गटनेते नवीन सदस्यांची नावे सूचवणार आहेत. त्यानंतर स्थायीचे एकूण सोळा सदस्य सभापतीची निवड करतील.
सभापतिपदावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा दावा केला आहे. सत्तेत सहभागी होताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाच वर्षे सभापतिपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे पुढचा सभापती मनसेचाच होणार असल्याचे डागवाले यांनी पदभार सोडताना स्पष्ट केले होते, परंतु या पदासाठी सत्ताधारी पक्षातील अनेकांनी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे हे पद पुन्हा मनसेकडे जाते की, त्यावर दुसरेच कुणी विराजमान होते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मनसेच्या चार नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्ष हे पद देण्याचा पक्षपातळीवर निर्णय झाला असल्याचे डागवाले यांनी सांिगतले. त्यामुळे सभापतिपद मनसेला मिळालेच, तर त्यावर चारपैकी कोण विराजमान होणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.सध्या महापािलका वर्तुळात याचीच चर्चा सुरू आहे.

बुधवारीही विशेष सभा
राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर्धा भरवणे, मोकळे भूखंड सांस्कृतिक भवन व विधाते प्राथमिक विद्यालयास देणे, विविध रस्त्यांचे नामकरण, शहरातील प्रमुख रस्त्यांवर खासगीकरणाच्या माध्यमातून ग्रँटी बसवणे आदी विषयांच्या मंजुरीसाठी येच्या बुधवारी (११ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. रिलायन्स खोदकामप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात येणार असल्याने ही सभा वादळी होणार आहे.