नगर- शहरात महिनाभरात डेंग्यूचे तब्बल 99 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी डेंग्यूची लागण झालेले तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शहराच्या विविध भागात पसरलेली काविळीची साथही आता आटोक्यात आली आहे. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, तसेच जनजागृती मोहीमही राबवण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी रविवारी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
मागील काही महिन्यांपासून नगर शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. काविळीची साथ आटोक्यात येत नाही, तोच डेंग्यूसदृश रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा दूषित झाल्याने आगरकर मळ्यासह विविध भागात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांना काविळीची लागण झाली. कािवळीची साथ आता पूर्णपणे आटोक्यात आली असल्याचा दावा महापािलका प्रशासनाने केला. परंतु शहरातील अनेक भागात अजूनही काविळीचे रुग्ण आहेत. त्यात नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.
डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येताच जाग्या झालेल्या महापािलका प्रशासनाने धूर फवारणीसह इतर उपाययोजना सुरू केल्या. आतापर्यंत डेंग्यूचे ९९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील तीन रुग्णांना कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले. हे तिन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले असल्याची मािहती प्रशासनाने दिली. साथीच्या आजारांमुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. मोठ्या प्रमाणात कािवळीची लागण झाल्याने आक्रमक झालेल्या काही नगरसेवकांनी तर आयुक्त विजय कुलकर्णी यांची भर सभेत खरडपट्टी केली होती. आता पुन्हा डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आयुक्त कुलकर्णी यांनी मागील आठवड्यात तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरोग्य विभाग कामाला लागले आहे. ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले, त्या ठिकाणी प्राधान्याने धूर फवारणी करण्यात येत आहे. शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना डेंग्यूच्या रुग्णाची माहिती कळवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूची लागण घरात निर्माण होणाऱ्या डासांमुळेच होते. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
डेंग्यूची साथ रोखण्यासाठी प्रशासन आता प्रभावी उपाययोजनांसह जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. डेंग्यू होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, त्याबाबत पोस्टर, मािहती फलक, वृत्तपत्रे, तसेच लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची मािहती प्रशासनाने दिली.
लोकसंख्या व प्रभागांचा विस्तार पाहता प्रशासनाने सुरू केलेल्या या उपाययोजना तोकड्या ठरत आहेत. आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वच्छतेसह सर्वच प्रभागांध्ये धूर फवारणी होणे आवश्यक आहे परंतु सध्या केवळ ठरावीक भागातच धूर फवारणी सुरू आहे. मागील वर्षीदेखील असाच प्रकार घडला होता.
अन्य शहरांतही लागण
नगर शहराप्रमाणेच पुण्या-मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये डेंग्यूची लागण झाली आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे डेंग्यूचे डास घरामध्येच निर्माण होतात. महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या, तरी नागरिकांनीदेखील आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास डेंग्यूची साथ आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल.डॉ. सतीश राजूरकर, आरोग्याधिकारी.
खासगी रुग्णालये हाऊसफुल
शहरातील रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. कावीळ व डेंग्यूसह मलेरिया, टायफॉइड, थंडीताप अशा आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयांमध्ये गर्दी झाली आहे. उपचारासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेचे आरोग्य केंद्र अद्ययावत असणे गरजेचे आहे, परंतु महापालिका प्रशासनाचे या केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी रुग्ण तिकडे फिरकत नाहीत.