आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० टनी प्रकल्पावर वर्षात ६६ लाखांची उधळपट्टी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाडेतत्त्वावर घेतलेल्या हायड्रोलिक वाहनावर दरमहा लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या उधळपट्टीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. बुरूडगाव येथील कचरा डेपोतील कचरा प्रक्रिया प्रकल्प, जो अद्याप पूर्ण क्षमतेने सुरूच झालेला नाही, त्यावर वर्षभरात थोडीथोडकी नाही, तर तब्बल ६६ लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यात प्रकल्पाच्या ठेकेदार संस्थेसह महापालिकेचे काही अधिकारी मालामाल झाले असल्याची चर्चा अाहे. ज्या प्रकल्पातून अद्याप काही िनष्पन्नच झाले नाही, त्यावर महापालिका प्रशासन दरमहा पाच ते साडेपाच लाख रुपये उधळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही प्रशासन ठेकेदारांवर चांगलेच मेहेरबान आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी चक्क आठ हजार रुपये तासाने हायड्रोलिक वाहन भाडेतत्त्वावर लावून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. दैनिक दिव्य मराठीने ही उधळपट्टी उघड करताच पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

आता तर तब्बल ६६ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बुरूडगाव येथील कचरा डेपोतील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर ही उधळपट्टी सुरू आहे. जो प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरूच झालेला नाही, त्यावर वर्षभरात ही उधळपट्टी झाली आहे. पुण्यातील एका ठेकेदार संस्थेने हा ५० टन क्षमतेचा प्रकल्प सुरू केला अाहे. डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचे काम ठेकेदार संस्था करते. त्याबदल्यात महापालिका संबंधित ठेकेदार संस्थेला दरमहा ठरावीक रक्कम देते. परंतु संबंधित ठेकेदार संस्था िकती तास काम करते, दररोज किती टन कचऱ्यावर प्रक्रिया होते, प्रकल्पामुळे महापालिकेचा फायदा झाला का, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत महापालिका प्रशासनाने ठेकेदार संस्थेला वर्षभरात ६५ लाख ८२ हजार रुपयांची बिले अदा केली आहेत.महापालिका प्रशासन राष्ट्रीय हरित लवादाची भीती दाखवून बुरूडगाव कचरा डेपोत चुकीची कामे करत असल्याचा आरोप स्थायी समितीने यापूर्वीच प्रशासनावर केला आहे. ज्या प्रकल्पातून अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे, असे असतानाही महापालिका प्रशासनाने एका ठेकेदार संस्थेवर मेहेरबान होत ६६ लाख रुपयांची उधळपट्टी का केली, याची उत्तरेदेखील आता संंबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करणार
^बुरूडगावकचरा डेपोमुळे आमची शेती आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच आम्ही महापालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली आहे. जो प्रकल्प अद्याप नीटनेटका सुरूच झालेला नाही, कचऱ्याचा प्रश्न "जैसे थे' आहे, तरी प्रकल्पावर एवढा खर्च होत असेल, तर ते चुकीचेच आहे. हा प्रकार पुढील सुनावणीच्या वेळी हरित लवादाच्या निदर्शनास आणून देऊ.'' जनार्दन कुलट, याचिकाकर्ते, बुरूडगाव.

कचरा प्रकल्पाची पाहणी करणार
^बुरूडगाव कचराडेपोतील प्रकल्पासाठी विजेची अडचण होती. प्रकल्पासाठी वीज देण्याची कार्यवाही सुरू अाहे. प्रकल्प २४ तास चालला पाहिजे, याची खबरदारी महापालिका घेणार आहे. प्रकल्पाची तातडीने पाहणी करून तेथील अडचणी दूर करण्यात येतील. ठेकेदार संस्थेला देण्यात आलेल्या बिलांबाबतही प्रशासनाकडून त्वरित माहिती घेण्यात येईल.'' सुरेखा कदम, महापौर.
बातम्या आणखी आहेत...