आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिकेतील सत्ताधा-यांनी धरले मुख्याधिका-यांना धारेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- पालिकेतील अधिकारी, कर्मचारी नगरसेवकांना जुमानत नाहीत, त्यांनी सांगितलेली कामे करताना उडवाउडवीची उत्तरे देतात यावरून सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिका-यांना धारेवर धरले. नगरसेवकांच्या तळमळीचे जर पालिका प्रशासनाला घेणेदेणे नसेल, तर पुढच्या बैठकीवेळी आॅईलचे डबेच सभागृहात आणू, असा इशारा सत्ताधारी गटाच्या नगरसेवकाने दिला.
नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची शुक्रवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे व उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांच्यासह नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सत्ताधारी गटासोबतच विरोधकांनी पालिकेच्या प्रशासनाला विविध विषयांवरून घेरले. नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकारी गोंधळले होते. ठेकेदाराच्या बिलांची फाईल गहाळ झाल्याचा ठपका ठेवत मुख्याधिका-यांनी तीन कर्मचा-यांना तातडीने निलंबित केले. मात्र, नगरसेवकांच्या तळमळीचे त्यांना काही देणे-घेणे नसल्याची टीका सेनेचे कैलास वाकचौरे यांनी केली, तर नगरसेवकांची तळमळ मुख्याधिकारी समजून घेणार नसतील, तर पुढच्या बैठकीवेळी सभागृहात आॅईलचे डब्बेच आणण्याचा इशारा सत्ताधारी गटाच्या सोमेश्वर दिवटे यांनी दिला.
फाईल गहाळप्रकरणी तीन कर्मचा-यांच्या निलंबनासंबंधात चौकशी अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याचे ठरले. नगरसेवकांशी कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत, तर सामान्यांचे काय, असा प्रश्न सत्ताधारी गटाच्या किशोर पवार यांनी उपस्थित केला. नगरसेवकांनी सांगितलेली कामे व्हायलाच हवी. मुख्याधिका-यांनी रिलायन्सचे 89 लाख रुपये ठेकेदारांच्या देण्यासाठी वापरले, हायमॅक्सचे बल्ब बसवण्यासाठी मुख्याधिकारी तरतूद करू शकत नसल्याचा आरोप केला. बेकायदेशीर बांधकामासंदर्भात केवळ नोटीसा बजावण्यापलीकडे मुख्याधिकारी काहीही करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधावल्लभ कासट यांनी केला. कर्मचारी सोपवलेली कामे करत नाहीत, असा आरोप माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केला. चर्चेत उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, किशोर पवार, नितीन अभंग, इसहाकखान पठाण, इम्रान शेख यांच्यासह कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर कर्पे या विरोधी नगरसेवकांनी सहभाग घेतला.
चोरीच्या प्रकरणातही लपवालपवी
एकीकडे बांधकाम विभागाची फाईल गहाळ झाल्याने तीन कर्मचा-यांचे निलंबन झालेले असतानाच दुसरीकडे लाईट विभागातील इलेक्ट्रिक सामानाची चोरी झाली. मालदाड रस्त्यावरील रोहीत्रच चोरट्यांनी चोरून नेले. कर्मचा-यांनी उर्वरित सामान काढून आणले. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सभागृहापुढे आली. या विषयातही संबंधितांकडून लपवालपवीची उत्तरे मिळत होती.