आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवांतर विषयांवर चर्चेस महापौरांकडून मनाई, डीपीआर रस्त्यांसाठी एजन्सी नियुक्तीस मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विविध विषयांच्या मंजुरीसाठी बोलावण्यात आलेली महापालिकेची विशेष सभा सत्ताधाऱ्यांनी अवघ्या पाऊण तासात गुंडाळली. विषयपत्रिकेशिवाय इतर विषयांवर चर्चा करू नका, अधिकाऱ्यांची चौकशी, तसेच विकासकामांमधील गैरव्यवहाराबाबत माहिती हवी असल्यास आयुक्त कार्यालयात जा, असा दम महापौर संग्राम जगताप यांनी दिला. त्यामुळे विरोधकांचा आवाज सभागृहात घुमलाच नाही.
महापौर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती. सतरावी राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निधी, विविध भागांतील सात मोकळे भूखंड शैक्षणिक व सामाजिक संस्थांना देणे, ८३ रस्त्यांच्या डीपीआरसाठी एजन्सीची नियुक्ती, रस्त्यांचे नामकरण असे विविध विषय सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. विषयपत्रिकेवरील विषय सोडून इतर विषयांवर चर्चा करण्याची सभागृहाची परंपरा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ही परंपरा मोडीत काढली. विषयपत्रिकेवरील विषय सोडून इतरांवर चर्चा करून सभागृहाचा वेळ वाया घालवू नका, अगोदर विषयपत्रिकेवरील विषयांवरच चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह नगरसेवक अभिषेक कळमकर व संजय घुले यांनी धरला. त्यास महापौर जगताप यांनी सहमती दाखवली. अधिकाऱ्यांची चौकशी, विकासकामांमधील गैरव्यवहार याबाबत माहिती हवी असल्यास आयुक्त कार्यालयात जा, असा सज्जड दमच जगताप यांनी दिला. त्यामुळे विरोधकही नरमले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर थोडीफार चर्चा करण्यात आली. सतराव्या राज्य महिला कुस्ती स्पर्धेसाठी अर्थसाहाय्य देण्याचा विषय सभेत होता. स्पर्धेसाठी भरीव निधी देण्यास सभागृहाने मंजुरी दिली. रस्त्यांच्या डीपीआरसाठी एजन्सी नियुक्तीसह इतर विषयही मंजूर करण्यात आले. अन्य विषयांवर चर्चा करू न दिल्याने अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
रिलायन्सप्रकरणी मनसेत दुफळी-
रिलायन्सच्या पैशांतून झालेल्या विविध रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहाराबाबत मनसे नगरसेवक मागील आठवड्यात अाक्रमक झाले होते. या नगरसेवकांच्या पाठोपाठ मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व पक्षाचे इतर पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मनपा कार्यालयासमोर आंदोलने केली. मनसेचे नगरसेवक मात्र या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे रिलायन्स प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
सभेतील प्रमुख मंजूर विषय-
राज्य महिला कुस्ती स्पर्धेसाठी भरीव निधी.
विविध भागातील सात मोकळे भूखंड संस्थांना देणे.
रस्त्यांच्या डीपीआरसाठी एजन्सीची नियुक्ती.
प्रमुख रस्त्यांवर बीओटी तत्त्वावर ग्रॅन्टी बसवणे.
विविध मार्गांचे नामकरण करणे.
सीना नदीवरील लोखंडी पुलाजवळ पूल बांधणे.
घनकचरा संकलनाची अंमलबजावणी करणे.