आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या मनपातील दालनासाठी महापौर-उपमहापौरांत तिढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जुन्या महापालिका कार्यालयातील दालनावरून महापौर सुुरेखा कदम उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने उपमहापौर छिंदम यांना त्यांच्या मागणीनुसार जुन्या महापालिका कार्यालयातील महापाैरांचे दालन उपलब्ध करून दिले. परंतु आता या दालनावर महापौर कदम यांनी देखील दावा केला आहे. उपमहापौर छिंदम यांनी मात्र दालनाचा ताबा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे.
नगर- औरंगाबाद महामार्गावरील नवीन महापालिका कार्यालय नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे दररोज दीड ते दोन तास जुन्या महापालिकेतील कार्यालयात थांबण्याचा निर्णय उपमहापौर छिंदम यांनी घेतला आहे. त्यासाठी जुन्या महापालिकेतील महापौरांचे दालन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली. प्रशासनाने त्यांची मागणी तत्काळ मंजूर करत त्यांना जुन्या महापालिकेतील महापौरांचे दालन उपलब्ध करून दिले. उपमहापौर छिंदम यांनी या दालनात बसून कामही सुरू केले. संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी थांबण्याचे आदेशही त्यांनी दिले. मात्र, उपमहापौरांनी आपल्या दालनात बसून कारभार सुरू केल्याचे समजताच महापौर कदम यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. हे दालन महापौरांचे असून त्यावर महापौरांचाच अधिकार असल्याचे कदम यांनी प्रशासनाला ठणकावले. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या प्रशासनाने महापौरांचे दालन सोडण्यासाठी उपमहापौर छिंदम यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. तुम्हाला दुसरे दालन उपलब्ध करून देऊ, परंतु सध्या महापौरांचे दालन सोडा, अशी विनवणी प्रशासनाने केली. परंतु छिंदम यांनी दालन सोडण्यास स्पष्ट नकार दिला. दालन उपलब्ध करून देण्यासाठी मी पत्र दिले होते. मला महापौरांचेच दालन हवे, असे मी म्हटले नव्हते, तुम्हीच मला महापौरांचे दालन उपलब्ध करून दिले. आता दालनाच्या बाहेर उपमहापौरांची पाटी देखील लागली आहे. त्यामुळे मी हे दालन सोडणार नसल्याचे छिंदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. प्रशासन आता यातून कसा मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिकारी झाले हतबल
महापौरांसाठी आता तुम्हीच नव्या दालनाची व्यवस्था करा, त्यासाठी २५ लाख रुपये खर्च आला तरी चालेल, असे छिंदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावले असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. महापौरांसह, उपमहापौरांच्या दबावामुळे अधिकारी कात्रीत सापडले असून त्यावर आता ते कसा मार्ग काढतात. हे लवकरच स्पष्ट होईल.

नागरी समस्यांचा होईना निपटारा
महापालिकेत सत्तांतर होऊन दीड महिना उलटला. शहरातील नागरी सुविधा कोलमडल्या असून नीवन पदाधिकारी त्यांचा तातडीने निपटारा करतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. गणेशोत्सव तोंडावर आला असताना अद्याप शहरातील खड्ड्यांचे पॅचिंग, दिव्यांची दुरुस्ती झालेली नाही. उलट साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी दालनासाठी चढाओढ करता नागरी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत पक्षीय वाद बाजूला ठेऊन नगरकरांसाठी सत्ताधाऱ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे.

जुन्या कार्यालयात थांबण्याची मागणी
नगर- औरंगाबाद महामार्गावरील नवीन महापालिका कार्यालय नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. मध्यवर्ती शहरासह, केडगाव, बुरूडगाव रोड परिसरातील नागरिकांसाठी हे कार्यालय दूर आहे. त्यामुळे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी दरराेज अथवा आठवड्यातून एकदा ठरावीक वेळेसाठी जुन्या महापालिका कार्यालयात थांबले पाहिजे, ही नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. काही अधिकारी- पदाधिकाऱ्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्यात सातत्य राहिल्याने नागरिकांची ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...