आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष उलटले तरी ‘मूलभूत’वरून सत्ताधारी-विरोधकांत चिखलफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आम्ही केलेल्या विकासकामांचे पुन्हा उद््घाटन करण्याचा आमदार संग्राम जगताप यांचा अट्टहास हास्यास्पद अाहे. विकासकामांमध्ये अाम्ही राजकारण करत नाही. आमदार जगताप मात्र पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराचा पराभव होऊनही त्याच भागातील विकासकामांची पुन्हा उद््घाटने करत आहेत, अशी टीका महापौर सुरेखा कदम यांनी केली.
प्रभाग मधील विविध कामांचा आमदार जगताप यांच्या हस्ते नुकतेच उद््घाटन झाले. मूलभूत सुविधांच्या निधीत आडकाठी आणणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपला या कामांची उद््घाटने करण्याचा अधिकार नाही, अशी टीका या वेळी जगताप यांनी केली होती. महापौर कदम यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, अाम्ही केलेल्या कामांचे उदघाटन करण्याचा आमदारांचा अट्टहास हास्यास्पद आहे. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून २० कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. या निधीतून अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. मनपाची अार्थिक स्थिती नाजूक असल्याने स्व:हिश्याचे २० कोटी माफ करावेत, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला. परंतु आघाडीच्या सरकारने मंजुरीत आडकाठी आणली. त्यानंतर मनपातील आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनाही २० कोटींचा स्व:हिस्सा भरण्यासाठी अडीच वर्षांचा काळ लागला. अजूनही २५ विकासकामांच्या स्व:हिश्याची रक्कम उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेश देता आले नाहीत.

आपण सर्वाेच्च सभागृहाचे सदस्य आहात. उदघाटने करण्याचा अधिकार कोणाचा आहे, ते आपल्याला माहिती आहे. महापालिकेतून पायउतार होताना अनेक विकासकामांची घाईत उदघाटने केली. आम्ही सत्तेत आल्यानंतर या कामांची पुन्हा उदघाटने केली नाहीत. आपण मात्र विकासकामांची पुन्हा उदघाटने करत आहात. नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना-भाजप नेहमीच कटिबध्द आहे. विकासकामात आम्ही कधी राजकारण केले नाही. ज्या भागात विकासकामांची आवश्यकता आहे, तेथे कामे सुरू करण्यात आली आहेत, अशा शब्दांत कदम यांनी आमदार जगताप यांच्यावर टीका केली.

अभ्यास केल्याशिवाय चुकीची वक्तव्ये महापौरांकडून नकोत
प्रतिनिधी | नगर
मूलभूत सुविधांमधील ४० कोटींची कामे आघाडीने मार्गी लावली. आमदार संग्राम जगताप महापौर असताना हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे या कामांची उदघाटने त्यांनी केली, तर महापौर कदम यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांनी अभ्यास केल्याशिवाय चुकीची वक्तव्य करू नयेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी महापौर कदम यांना दिला.

तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी सरकारने शहराच्या विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला. या निधीत मनपाने तेवढाच स्व:हिस्सा भरणे आवश्यक होते. दरम्यानच्या काळात मनपात आघाडीची सत्ता आली. आमदार जगताप यांनी महापौरपदी असताना या योजनेच्या प्रस्तावाला गती दिली. तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्या कार्यकाळात ४० कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही झाली. मात्र, शिवसेना-भाजप विराेधकांनी विभागीय आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून ४० कोटींच्या कामांना स्थगिती मिळवली. एकीकडे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करण्याच्या घोषणा देणाऱ्या शिवसेनेने चांगल्या कामात आडकाठी आणली. आमदार जगताप कळमकर यांनी या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले. औरंगाबाद खंडपीठात याचिकादेखील दाखल केली. त्यामुळे या कामांवरील स्थगिती उठवणे राज्य सरकारला भाग पडले. आमदार जगताप यांच्यामुळे जर ही ४० कोटींची कामे मार्गी लागली असतील, तर त्यांनी उदघाटने केली, तर महापौर कदम यांना त्याचे एवढे वाईट वाटण्याचे कारण नाही. त्यांनी महापालिकेचा अभ्यास केल्याशिवाय चुकीची वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला बारस्कर यांनी दिला.

शहरात अनेक नागरी प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी महापौरांनी वेळ देणे गरजेचे आहे. परंतु महापौर निवडणुकीत झालेला खर्च कसा वसूल करता येईल, यासाठीच प्रयत्न सुरू अाहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करावे. महापौरपद शिवसेनेचे नसून ते महापालिकेचे आहे, याचा विसर पडल्यामुळेच महापौर बेजबाबदारपणे भाष्य करत असल्याचेही बारस्कर यांनी पत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...