आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजनांकडे मनपासह नागरिकांचेही झाले दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेसह नागरिकांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, विविध आजारांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आवाहन शहरातील काही खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी "दिव्य मराठी'शी बोलताना केले. विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे केवळ महापालिकेची नसून ती प्रत्येक कुटुंबाची अाहे, तसे झाले तरच रुग्णांची संख्या आटोक्यात येणार असल्याचे या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
चिकुनगुन्या, गोचिड ताप, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांनी नगरकर त्रस्त झाले आहेत. शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झालेली आहे. विविध अाजारांना रोखण्यासाठी महापालिकेकडून मागील दोन-तीन महिन्यांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. धूर औषध फवारणीसह घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करणे, गप्पी मासे सोडणे, जनजागृती करणे, रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवणे यासारखे उपाय सुरू आहेत. परंतु सतच्या पावसामुळे या उपाययोजना कमी पडत आहेत. विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात नागरिकांची उदासिनता दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, ती प्रत्येकाची आहे, तरच रुग्णांची संख्या आटोक्यात येईल, असे आवाहन खासगी रुग्णालयातील डॉक्टर करत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, हे काम एकट्या महापालिकेचे नाही, ते प्रत्येकाचे असल्याचे डॉक्टर सांगतात. ऑगस्ट महिन्यात खासगी रुग्णालयांमधील रुग्णांचे प्रमाण ४५ टक्के होते, सध्या मात्र हे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांपर्यंत खाली आले असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. परंतु पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हजारो रुपये खर्च करावेत लागत आहे. आजारी पडल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आजारी पडण्याअगोदर आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन खासगी डॉक्टर करत आहेत.

शहराच्या विविध भागांमध्ये धूर औषध फवारणी सुरू आहे. तसेच घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करून हौदांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. नागरिकांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रुग्णांची संख्या झाली कमी
^ऑगस्ट महिन्यात रुग्णांची संख्या जास्त होती. परंतु सप्टेंबर महिन्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. महापालिकेने शहरातील काही खासगी रुग्णालयातील रुग्णांची पाहणी केली. त्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोकळ्या प्लॉटधारकांनी प्लॉटची साफसफाई करावी; अन्यथा प्लॉटधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.’’ डॉ.अनिल बोरगे, आरोग्याधिकारी, महापालिका.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
घराचा परिसर स्वच्छ ठेवावा
पावसाचे पाणी साचू देऊ नये
पिण्याचे पाणी झाकून ठेवावे
झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये
घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात
झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा
घरातील आजारी व्यक्तीपासून दूर राहावे
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा

१५०० रुग्णांचे घेतले रक्ताचे नमुने
महापालिकेच्या अारोग्य विभागाने आतापर्यंत दीड हजार रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. त्यापैकी केवळ १२ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले, हे रुग्ण देखील आता पूर्ण बरे झालेले आहेत. घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन वेळा हा सर्व्हे करण्यात आला असून तिसरा सर्व्हे सुरू आहे. तिसऱ्या सर्व्हे पन्नास हजार घरांची पाहणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने शहरात धूर औषध फवारणीचे कामही सुरूच आहे.
बातम्या आणखी आहेत...