आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका मालामाल; तीन कोटींवर कर जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार महापालिकेने मालमत्ता करापोटी जुन्या पाचशे हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शहरातील करदात्यांनी, विशेषत थकबाकीदारांना पाचशे, हजारच्या नोटा घेऊन महापालिकेची करभरणा केंद्र गाठले. मध्यरात्री बारापर्यंत वसुलीला मोठा प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत वसुलीचा आकडा तीन कोटींवर पोहोचला. नोटा बंदच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे महापालिकेला अनपेक्षितपणे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
केंद्र सरकारने पाचशे हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर महापालिकेने या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. मालमत्ता करापोटी या नोटा महापालिकेने स्वीकाराव्यात, अशी मागणी नागरिकांसह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. महापालिकेने सरकारकडे याबाबत मार्गदर्शन मागवले होते. राज्य सरकारने गुरुवारी काढलेल्या अधिसूचनेनुसार या नोटा मालमत्ता करापोटी स्वीकारण्याचा निर्णय झाला. मालमत्ता करापोटी पाचशे हजारच्या नोटा केवळ शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंतच स्वीकारण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम आदींनी केले.

गुरुवारी (१० नोव्हेंबर) उशिरा सरकारने पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिल्यानंतर रात्री बारापर्यंत वसुली सुरू होती. कर्मचारी मध्यरात्रीपर्यंत कार्यालयात कर जमा करण्यासाठी थांबले होते. नागरिकांनी गेले दोन दिवस नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावल्या आहेत. तथापि, एका व्यक्तीला एकावेळी केवळ चारच हजार रुपये बदलून मिळत आहेत. त्यामुळे अनेकांनी हजार, पाचशेच्या नोटा मालमत्ता करापोटी भरणे पसंत केले.
भरणा करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. महापालिकेची एकूण थकबाकी १८४ कोटी आहे. अनेक वर्षांपासून ही थकबाकी वाढते आहे. मनपा प्रशासनाकडून वसुलीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने कर वसुलीत आतापर्यंत फारसे यश आले नव्हते. हजार, पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ्थ्यावर पडला. या माध्यमातून उद्योजकांसह इतर करदात्यांनी थकबाकी भरण्यासाठी गर्दी केली होती. मोठ्या रांगा लागल्याने वसुलीसाठी तीन काउंटर सुरू करण्यात आले. दुपारी दीडपर्यंत कोटी ३७ लाखांचा कर जमा झाला होता. चार वाजेपर्यंत वसुलीचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचला. रात्री बारापर्यंत वसुलीचा आकडा तीन कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

शहरातील ‘ब्लॅक मनी’ येतोय बाहेर
दडवून ठेवलेला बेहिशेबी पैसा बँकांमध्ये जमा केल्यास आयकर विभागाचा ससेमिरा नको, म्हणून शक्य त्या मार्गाने काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही मंडळींनी दडवून ठेवलेला काळा पैसा कररुपात भरण्यास प्राधान्य दिले.

...तर वसुली आणखी वाढली असती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ मनपाला या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली असती, तर वसुलीचा आकडा यापेक्षाही मोठा असता, असे शहरातील जाणकारांचे मत आहे.

प्रथमच होत आहे विक्रमी वसुली
महापालिका प्रशासनाने मालमत्ता करापोटी थकबाकी वसूल करण्यासाठी विविध उपाय केले होते. परंतु कोणतेही विशेष प्रयत्न करता एक-दीड दिवसात तीन कोटींवर विक्रमी वसुली होण्याची ही शहरातील पहिलीच वेळ अाहे.
बातम्या आणखी आहेत...