आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा नाट्यगृहाच्या कामाला पुन्हा घरघर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वीजबिल थकल्यामुळे महावितरणने महापालिकेचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे सावेडीतील नाट्यगृहाचे काम आठ दिवसांपासून ठप्प झाले आहे. मोठा गाजावाजा करत नाट्यगृहाचे भूमिपूजन उरकण्यात आले. मात्र, गेल्या सहा महिन्यांत नाट्यगृहाचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रसिकांना या नाट्यगृहासाठी आणखी बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापौर अभिषेक कळमकर यांनी पदभार घेताच सावेडी नाट्यगृहाचे १९ जुलै २०१५ रोजी मोट्या थाटात भूमिपूजन केले. यावेळी लाखो रुपये खर्चून (ठेकेदाराच्या खिशातून) नगरकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्यात आली. विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नाट्यगृहाची नगरकर रसिकांना नितांत गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याच्या आणाभाका यावेळी उपस्थित मान्यवरांनी घेतल्या. मात्र, या आणाभाकांचा सर्वांनाच विसर पडला आहे. भूमिपूजन होऊन सहा महिने उलटले, तरी नाट्यगृहाच्या कामाची प्रगती जैसे थे आहे. सहा महिन्यांत नाट्यगृहाच्या इमारतीचा पायादेखील उभा राहिलेला नाही.
शासनाकडून दोन कोटी रुपये या कामासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी ५० लाखांचा निधी शासनाने मनपाकडे वर्गही केला आहे. निधी मंजूर असतानाही नाट्यगृहाच्या कामाला गती मिळालेली नाही. वीजबल थकल्याने महावितरणेने महापालिकेचा काही भागातील वीजपुरवठा खंडित केला आहे. नाट्यगृहाच्या कामाला त्याचा फटका बसला आहे. वीजपुरवठा होत नसल्याने नाट्यगृहाचे काम आठ दिवसांपासून ठप्प आहे.

शहरात नाट्यगृह उभारावे, अशी नाट्यकर्मी नाट्यप्रेमींची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यानुसार महापालिकेने सावेडी क्रीडा संकुलात नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते. त्यात क्रीडा संकुलाच्या जागेवरील कचऱ्याची मोठी अडचण होती. ही समस्या सहा महिन्यांपूर्वी दूर झाली, तरी नाट्यगृहाचे काम रखडलेलेच आहे.
हे नाट्यगृह एक एकर जागेवर उभारण्यात येत असून त्यात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असतील. पार्किंग, कँटिन, स्वच्छतागृह या सुविधांसह तांत्रिक बाबी लक्षात घेऊन भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. एक हजार नाट्यप्रेमींना एकाच वेळी नाटकाचा आनंद घेता येऊ शकेल. नाट्यगृहाचा परिसरही सुशाेभीत करण्याचे नियोजन आहे. परंतु ही भव्य वास्तू पाहण्यासाठी आणखी बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आश्वासनही हवेत
नाट्यगृहाच्या कामात कामात खंड पडू देणार नाही, असे आश्वासन महापौर अभिषेक कळमकर यांनी भूमिपूजन सोहळ्यात नगरकरांना दिले होते. मात्र, त्यांचे हे आश्वासन हवेतच विरले आहे. सहा महिन्यांत नाट्यगृहाचे दहा टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. यावरूनच या कामाची प्रगती स्पष्ट होते. वीजपुरवठा नसल्याने आठ दिवसांपासून हे काम ठप्प आहे.

एक हजार आसनक्षमता
सुरूवातीला पाचशे आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. त्यासाठी साडेपाच कोटींचा निधी लागणार होता. परंतु पदाधिकारी प्रशासनाने पाचशेऐवजी एक हजार आसन क्षमता असलेले नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून अनुदान स्वरूपात जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा मनपाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मिळाली.