आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कामगारांचे ठिय्या आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना महसूलचे अधिकारी बेकायदेशीर कामे करायला लावत आहेत. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने लक्ष घालावे, या मागणीसाठी मनपा कर्मचारी संघटनेने मंगळवारी दुपारी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जिल्हा प्रशासनाने मनपाच्या २५३ कर्मचाऱ्यांना मतदार याद्या पुनर्निरीक्षणासह निवडणुकीच्या विविध कामांसाठी वर्ग करून घेतले आहे.

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मनपा कर्मचाऱ्यांना दादागिरी करत बेकायदेशीर कामे करायला भाग पाडत आहेत. यापूर्वी देखील मनपा कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला आहे. या प्रकरणी मनपा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. मनपा कर्मचाऱ्यांना बीएलओच्या कामातून मुक्त करण्याबाबत महसूल प्रशासनाला स्पष्ट कळवावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदाेलन करण्यात आले.

संघटनेने प्रथम मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी आयुक्त विलास वालगुडे बैठकीत व्यग्र होते. आंदोलक घोषणाबाजी करत बैठक सुरू असतानाच त्यांच्या दालनात घुसले. त्यामुळे आंदोलक वालगुडे यांच्यात बाचाबाची झाली. शेवटी वालगुडे यांनी मनपा कर्मचाऱ्यांना बीलओच्या कामातून मुक्त करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, सूर्यभान देवगडे, विजय बोधे, बाबासाहेब मुदगल यांच्यासह मनपाचे बीएलओ कर्मचारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना वर्षाला पाच हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मागील वर्षी केवळ चार हजार रुपये देऊन कर्मचाऱ्यांची बाेळवण करण्यात आली. एक हजार रुपये गेले कुठे, असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. आंदोलनामुळे मनपा कार्यालयात काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला.

दादागिरीची भाषा नको
कर्मचारीप्रामाणिकपणे निवडणुकीचे काम करत आहेत. परंतु महसूलचे काही अधिकारी दादागिरी करून त्यांच्याकडून चुकीची कामे करून घेतात. त्याबाबत मनपा प्रशासनाला कळवण्यात आले होते. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यापुढे दादागिरी खपवून घेणार नाही.'' अनंतलोखंडे, अध्यक्ष, मनपा कर्मचारी संघटना.

वसुलीवर परिणाम
जिल्हाप्रशासनाकडे निवडणूक कामासाठी वर्ग करण्यात आलेले मनपा कर्मचारी वसुली अारोग्य विभागातील आहेत. हे कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या वसुली आरोग्य सेवेवर झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून तत्काळ मुक्त करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
बातम्या आणखी आहेत...