आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेकडून उच्च न्यायालय ‘फाट्यावर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, आलेली तक्रार पंधरा दिवसांच्या आत निकाली काढावी असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. नगर महापालिकेने मात्र न्यायालयाचे हे आदेश फाट्यावर मारले आहेत. खड्ड्यांबाबत तक्रारच नव्हे, तर तीव्र आंदोलने करूनही हा प्रश्न "जैसे थे' आहे. त्यामुळे येथील जागरूक नागरिक शाकिर शेख यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात तक्रारअर्ज दाखल केला आहे.

मुंबईसह राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयाने महापालिकांवर ताशेरे आेढले आहेत. खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना संकेतस्थळ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा, तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती पंधरा दिवसांच्या आत निकाली निघाली पाहिजे, असे आदेश उच्च न्यायालयाने मे २०१५ मध्ये दिले आहेत. या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता संबंधित महापालिका प्रशासनाने घेणे बंधनकारक आहे. अवमान झाल्यास संबंधित महापालिका आयुक्ताला जबाबदार धरणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नगर महापालिकेने न्यायालयाचे हे आदेश फाट्यावर मारले आहेत. नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी अद्याप कोणतेही संकेतस्थळ अथवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. खड्ड्यांच्या समस्येमुळे संपूर्ण शहर त्रासले आहे. तक्रारअर्ज, आंदाेलने करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. ही सर्व परिस्थिती शाकिर शेख यांनी मार्च २०१६ मध्ये तक्रारअर्जाद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. महापालिका प्रशासनाने अद्याप कोणत्याच आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने आपली तक्रार सुमोटो याचिका म्हणून दाखल करून घ्यावी, तसेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे सचिव, नगर महापालिका आयुक्त शहर अभियंता यांच्याकडून याप्रकरणी शपथपत्र घ्यावे, तसेच न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी आयुक्त शहर अभियंत्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी शेख यांनी न्यायालयाकडे केली आहे.

सध्या गणेशोत्सवामुळे शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. परंतु ठेकेदार संस्था अधिकारी यांचे संगणमत असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे खड्ड्यांवरील लाखो रुपयांचा खर्च पुन्हा वाया जाणार आहे.
एकाच वर्षात एक कोटी खर्च
मागील वर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचिंग करण्यासाठी महापालिकेने तब्बल ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. खड्ड्यांच्या पॅचिंगच्या नावाखाली हा सर्व निधी वापरण्यात आला. परंतु अवघ्या काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था “जैसे थे’ झाली. यंदाच्या गणेशोत्सवातही खड्ड्यांचे पॅचिंग करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या पॅचिंगचे काम सुरू असून ते निकृष्ट आहे. विशेष म्हणजे वर्षभरात हे ख‌ड्डे अनेकदा बुजवूनही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे.
खड्ड्यांच्या कामातही गैरव्यवहार
महापालिकेने मागील वर्षी खड्ड्यांवर ६० लाख खर्च केले. आता पुन्हा लाखो रुपयांचा खर्च सुरू आहे. निधी मंजूर करून त्यात गैरव्यवहार करण्याचे काम सुरू आहे. एकिकडे न्यायालयाचे आदेश असूनही अंमलबजावणी होत नाही, तर दुसरीकडे पैसे खाण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे तक्रार दाखल केली. शाकिर शेख, तक्रारदार.
असे आहेत न्यायालयाचे आदेश
>तक्रार केंद्रावर तक्रार नोंदवून घेण्याची सुविधा द्यावी
>तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा
>तक्रार करण्यासाठी संकेतस्थळ सुरू करावे
>दूरध्वनीवरून आलेल्या तक्रारींची नोंद घ्यावी
>तक्रार निकाली काढल्याचे छायाचित्र प्रसिध्द करा
>तक्रार पंधरा दिवसांच्या अात निकाली काढावी
बातम्या आणखी आहेत...