आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या खूनप्रकरणी आरोपी पित्याला फाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पोटच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जिल्हा न्यायालयाने आरोपी पित्याला फाशीची शिक्षा ठोठावली. इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (६५, रा. गल्ली नं. ३, प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) असे आरोपीचे नाव आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत द. कुलकर्णी यांनी शनिवारी हा निकाल दिला. खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल डी. सरोदे यांनी काम पाहिले.
राहुरी पोलिस ठाण्यात आलेल्या फोनवरुन ही घटना उजेडात आली होती. हेड कॉन्स्टेबल सुनील आहेर हे ड्यूटीवर असताना पोलिस ठाण्यात खून झाल्याचा फोन आला. आहेर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता अन्सारी याच्या घरात त्यांची मुलगी गुलअब्सा (१७) हिचा मृतदेह सापडला. आहेर यांनी तिच्या आईकडे चौकशी केली असता इस्लामउद्दीन अन्सारी यांना गुलअब्साच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून तिचा खून केल्याचे समोर आले. मे २०१५ रोजी इस्लामउद्दीनने गुलअब्साचा गळा आवळून डोक्यात लाकडी दांडक्याने मारुन तिचा खून केला. याप्रकरणी आहेर यांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास केला. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस. चव्हाण यांनी केला न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षातर्फे एकूण साक्षीदार तपासले. खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मुलीची आई, बहीण, महत्त्वाचे पंच साक्षीदार फितूर झाले होते. पण, फिर्यादी हेड कॉन्स्टेबल सुनील आहेर, तपासी अंमलदार उपनिरीक्षक चव्हाण, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. वैरागर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाचा पुरावा, सरकारी वकिलांच्या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने इस्लामउद्दीनला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. तपासी यंत्रणा सरकारी वकिलांच्या प्रयत्नांमुळे एक वर्षाच्या आतच या खटल्याचा निकाल लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...