आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्वर पटेल मृत्यू- खुनाचा गुन्हा दाखल, संगीतकार माणिक हाथीदारूंसह पाचजण आरोपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील कथित इस्टेट एजंट अन्वर मुश्ताक पटेल (२९, नालसाब सवारीजवळ, झेंडीगेट)याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. शनिवारी रात्री अन्वरचा मृतदेह कामरगाव शिवारात आढळला. नगर तालुका पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, परंतु याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करत नातेवाईक मित्रमंडळींनी अन्वरचा मृतदेह रविवारी रात्री साडेदहापर्यंत नगर तालुका पोलिस ठाण्यासमोरच ठेवला. रात्री उशिरा जुन्या पिढीतील ख्यातनाम संगीतकार माणिक हाथीदारू यांच्यासह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला.

शनिवारी रात्री नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात हाॅटेल इंद्रज्योतजवळ एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कामरगावचे माजी पोलिस पाटील बाळासाहेब बापूराव ठोकळ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृताच्या खिशात आढळलेल्या काही ओळखीच्या कागदपत्रांवरून ओळख पटली. अन्वर पटेलचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. रविवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेसह नगर तालुका पोलिस ठाण्यासमोर आणला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

नगर तालुका पोलिस ठाण्यासमोर सुमारे तीनशेहून अधिक लोक जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार अन्वर पटेल हा इस्टेट एजंट म्हणून काम करत होता. त्यांनी शिलाविहार भागातील एक मालमत्ता विकत घेतली होती. त्यावरून त्याचे काहीजणांशी वाद झाले होते. त्यातूनच काही जण अन्वरला एका वाहनातून घेऊन गेले. नंतर थेट त्याचा मृतदेहच सापडला. मृतदेहावर मारहाणीच्या जखमा असल्यामुळे त्याचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यामुळे खुनाचा गुन्हा नोंदवेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यासमोरून हलवणार नाही, असा पवित्रा पोलिस ठाण्यात जमलेल्या जमावाने घेतला.

पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परीविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक विशाल अानंद, नगर ग्रामीण उपविभागाचे उपअधीक्षक आनंद भोईटे, सहायक निरीक्षक विनोद पाटील यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी, अशी विनंतीही करण्यात आली. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सांगण्यात आले. परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ही चर्चा रात्री सुमारे दहापर्यंत सुरू होती. अखेरीस अन्वरचा भाऊ एजाज याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून घेतला.

जागेचा वाद कारणीभूत
मृतअन्वर पटेल हा इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अन्वरचे एका जागेचे साठेखत झाले होते, पण या जागेवरील हक्क तो सोडत नव्हता. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून त्याला मारहाण करून खून केल्याचे अन्वरचा भाऊ एजाज याने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओचाही वापर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून योग्य दिशेने तपास करण्याचे आश्वासन अन्वरच्या नातेवाईकांना दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, त्यांच्या नावामुळे आश्चर्य