आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराहबागेत रंगली अनोखी मैफल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एरवी सुनसान असलेला फराहबक्ष महाल चैतन्याने ओसंडत होता... काव्य-संगीताच्या मैफलीने महालाच्या दगडी भिंतीही जणू जिवंत झाल्या होत्या. त्यांना आठवत होत्या चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी याच रंगमहालात रंगणाऱ्या मैफली...सुफी संगीतासाठी प्रसिद्ध असलेेले पवन नाईक यांनी सादर केलेल्या रचना, मधुकरराव चौधरी यांचे ब्रह्मवीणावादन आणि रंगलेला मुशायरा ऐकत हा महाल आणि या मैफलीचे साक्षीदार असलेले रसिक तृप्त झाले.

नगर शहराच्या ५२५ व्या स्थापना वर्षाचे औचित्य साधून "दिव्य मराठी'च्या वतीने आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने आयोजित "सिटी वॉक' उपक्रमात रविवारी सोलापूर रस्त्यावरील ऐतिहासिक फराहबक्ष महालाला भेट देण्यात आली. या वास्तूचा इतिहास जाणून घेण्याबरोबर ज्या कारणासाठी ही वास्तू उभारण्यात आली, तो काव्य, संगीत मैफलीचा योग यानिमित्ताने नगरप्रेमींना घडवण्यात आला. सन १५८३ मध्ये उभ्या राहिलेल्या या वास्तूच्या रंगमहालात काही शतकांनंतर असा कार्यक्रम झाला.

उपस्थितांचे स्वागत करून भूषण देशमुख यांनी या महालाचा इतिहास कथन केला. मैफलीला प्रारंभ झाला नादब्रह्म संगीतालयाचे पवन नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुफी संगीताने. ए. आर. रहमान यांनी संगीत दिलेले "जोधा अकबर' चित्रपटातील "ख्वाजा मेरे ख्वाजा...' हे गीत एेकताना तो ऐतिहासिक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात सर्व कलाकारांचे कौतुक केले.

नंतर सुरू झालं स्वर्गीय संगीताचा अनुभव देणारं मधुकरराव चौधरी यांचे ब्रह्मवीणावादन. अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेले हे वाद्य अनेकांना पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चौधरी यांनी प्रथम राग दरबारी व नंतर राग बागेश्री सादर केला. थेट हृदयाला स्पर्श करणारे हे संगीत ऐकताना सगळे भावविभाेर झाले.

मैफलीची सांगता बहारदार कवितांनी झाली. सूत्रसंचालन संजीव तनपुरे यांनी केलं. या मैफलीस जि. प. सीईओ शैलेश नवाल, सिनेट सदस्य प्रशांत गडाख, रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर, मर्चंटस्् बँकेचे संचालक सुभाष भांड, सुधीर मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश हराळ यांनी काढलेलं महालाचं चित्र नवाल व गडाखांना भेट देण्यात आलं. "दिव्य मराठी'चा संग्राह्य दिवाळी अंक व यशवंतराव गडाख यांचं "अंतर्वेध' पुस्तक उपस्थित सर्वांना देण्यात आलं.