आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाची ‘मायस्टॅम्प’ योजना जिल्ह्यात सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आपलेही टपाल तिकीट असावे ही सर्वांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी टपाल विभागाने ‘मायस्टॅम्प’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्टॅम्पच्या प्रिंटिंगसाठी श्रीरामपूर येथील टपाल कार्यालयात मशीन उपलब्ध झाले आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक एस. एस. शिरसी यांनी दिली.

दिल्ली येथे 2011 मध्ये वर्ल्ड फिलॉटिक एक्झिबिशनमध्ये ही योजना सुरू झाली. ‘मायस्टॅम्प’ला मागणी वाढल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक येथे ही योजना सुरू करण्यात आली. आपले ओळखपत्र, छायाचित्र दिल्यावर आपला स्टॅम्प तयार होतो. त्यासाठी पोस्टात ग्राहकांना तीनशे रुपये भरावे लागतील. या तीनशे रुपयांत पाच रुपयांचे 12 आपले फोटो असलेले स्टॅम्प मिळतील. उर्वरित रक्कम पोस्ट खात्याकडे जाते. ही तिकिटे देशभरात कुठेही वापरता येतात. ग्राहकांनी अर्ज भरून दिल्यानंतर याची खातरजमा करून संबंधित कर्मचारी ग्राहकाचा स्टॅम्प छापण्यासाठी श्रीरामपूरला पाठवेल.

श्रीरामपूरहून हे 12 तिकिटांचे कार्ड असलेले शीट दोन दिवसांनंतर प्रिंट होऊन नगर येथील प्रधान डाकघरमध्ये येतील. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, तर प्रिंटिंग मशीन नगरला आणू, असेही शिरसी यांनी सांगितले. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिरसी यांच्यासह वरिष्ठ पोस्टमास्तर आर. ए. धस, जनसंपर्क अधिकारी बी. डी. निंबाळकर, विपणन अधिकारी यू. डी. शेख यांनी केले आहे.

‘मायस्टॅम्प’साठीची प्रक्रिया
शासनमान्य ओळखपत्र, एक फोटो, नाव, पत्ता, ई-मेल आयडी असलेला अर्ज पोस्टात भरून द्यावा. ‘मायस्टॅम्प’वर स्वत:च्या फोटोसह कलात्मक चित्रे, फुलांची चित्रे, पर्यटनस्थळे आदींची चित्रे वापरता येतात.

स्पीड पोस्टसाठी वापर
- पूर्वी थोरांचे, महान कार्य करणा-या व्यक्तींचेच स्टॅम्प काढले जात. ही कल्पना टपाल खात्याने पुसून काढली आहे. सामान्य माणूसही ‘मायस्टॅम्प’ काढू शकतो. या तिकिटांचा वापर देशभरात रजिस्टर, स्पीड पोस्टसाठी होऊ शकतो.’’ एस. एस. शिरसी, प्रवर डाक अधीक्षक.