आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाव कांबी येथील मुलीवरील अत्याचाऱ्याचा निषेध, नाभिक समाज एकवटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेवगाव तालुक्यातील हातगाव-कांबी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मूक मोर्चा काढला. मोर्चात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्राच्या बहुतांशी जिल्ह्यातील समाज सहभागी झाला. 
 
गांधी मैदानापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. गांधी मैदानावर नऊ मुलींची भाषणे झाली. त्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. हातगाव-कांबी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली, तसेच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. पीडित मुलींच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशादेखील मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर हा मोर्चा चितळे रस्ता, तेलीखुंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक, जुना बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात सहभागी झालेल्या अनेक युवतींनी काळे कपडे परिधान करून घटनेचा निषेध केला. अनेक युवकांनी काळे टीशर्ट परिधान केले होते. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी होणाऱ्या नऊ मुलींनी मशाल पेटवली. सकाळी नऊ वाजल्यापासून गांधी मैदानावर गर्दी होऊ लागली होती. मोर्चामुळे गांधी मैदानावरील बाजारदेखील बंद ठेवण्यात आला होता. मोर्चात महिला मुलींची उपस्थिती लक्षणीय होती. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर हा परिसर गर्दीने फुलून गेला होता. सकल नाभिक समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकताच पोलिसांनी प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर थोडासा गोंधळ उडाला. प्रवेशद्वाराबाहेर नाभिक समाजाचा मोर्चा असताना प्रवेशद्वाराच्या आतमध्ये शिवसेनेची कर्जमाफीसाठी निदर्शने सुरू होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर सकल नाभिक समाजातर्फे राज्याच्या विविध भागातून आलेल्या मोहिनी कोरडे (लोणी), स्वाती चौधरी (कोल्हापूर), कोजागिरी राऊत (नगर), दीपाली शिंदे (नगर), जागृती सोनवणे (जळगाव), प्रियंका वाघमारे (नगर), कल्पना क्षीरसागर (शेवगाव), पूनम देवकर (मुंबई) प्राजक्ता अनारसे या नऊ मुलींनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन दिले. शेवगाव तालुक्यातील हातगाव कांबी येथे अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार हा निंदनीय अाहे. झालेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. समाजात अशा प्रकारच्या घटना घडू नये, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाभिक समाजातील कोणतीही एक संघटना काम करत नसून, सर्वच संघटना एकत्र येऊन सकल नाभिक समाज या नावाने सर्व एकत्र काम करत आहे. तसेच हा मोर्चा कोणत्याही जाती समाजाविरुद्ध नसून, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध आहे. त्यासाठी सर्वच समाजातील संघटनांनी यासाठी आपला पाठिंबा सकल नाभिक समाज कोअर कमेटीकडे पत्राद्वारे दिला. 
 
खटला जलदगती न्यायालयात चालवा 
अशाप्रकारच्याघटना होणार नाही, दक्षता घेतली पाहिजे. आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यास द्यावा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. 
- मोहिनी कोरडे, लोणी. 
 

मोर्चात ३५ हजार समाज सहभागी 
हातगाव-कांबीयेथीलअल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल नाभिक समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. इतिहासात प्रथम हा समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आहे. मोर्चात ३५ हजार नाभिक समाज सहभागी झाला होता. समाजाचे हे सर्वात मोठे आंदोलन झाले. 
- विकास मदने, पदाधिकारी, सकल नाभिक समाज, अहमदनगर

 
मोर्चाला विविध संघटनांचा पांठिबा 
मोर्चाला सकल मराठा समाज, चर्मकार समाज, संत सावता माळी समाज, त्वष्टा कासार समाज, ज्येष्ठ नागरिक मंच, बहुजन समाज पक्ष, रिपाइं, आेबीसी फाउंडेशन, वेल्फेअर पार्टी, सोलापूर तेलगू ज्ञाती संघटना, सलमनिया जमात संघटना, भाजप आेबीसी आघाडी, राष्ट्रवादी आेबीसी आघाडी, शिवसेना आेबीसी आघाडी, युवक क्रांती दल, काँग्रेस आेबीसी आघाडी, बामसेफ, आेबीसी क्रांती मोर्चा, सावता परिषद, भारिप बहुजन महासंघ यासह अन्य संघटनांनी पांठिबा दिला. 
 
मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या 
अत्याचार पीडित मुलीची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांना सरकारी मदत द्यावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. 
- स्वाती चौगुले, कोल्हापूर. 
 
रुग्णवाहिकेला दिली वाट करून 
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अाल्यानंतर प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचवेळी हातमपुरा रस्त्याने १०८ ही सरकारी रुग्णवाहिका आली. त्यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिला पुरुषांनी या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देऊन गर्दी या रुग्णवाहिकेला बाहेर काढले. 
बातम्या आणखी आहेत...