आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित मागण्यांसाठी रोखली केके एक्स्प्रेस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रेल्वेसंदर्भात विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. बंगलुरू-दिल्ली ही केके एक्स्प्रेस 10 मिनिटे अडवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

केके एक्स्प्रेस दुपारी बारा वाजता स्थानकावर येण्यापूर्वीच आंदोलक रेल्वेमार्गावर उतरून घोषणाबाजी करत होते. चालकाने आंदोलकांना पाहून गाडी उड्डाणपुलाजवळ उभी केली. आंदोलकांनी घोषणाबाजी करत गाडीकडे धाव घेतली. तब्बल दहा मिनिटे रेल्वेमार्ग व इंजिनावर चढून घोषणाबाजी करण्यात आली. प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार गांधी यांनी या वेळी दिला.

नगर-पुणे प्रवासाचे अंतर व वेळ कमी करण्यासाठी केवळ 20 ते 22 किलोमीटरचा कव्र्हेचर दौंडनजिक तयार करण्याची आवश्यकता आहे. पुण्याशी जलद संपर्कामुळे नगरचा विकास होण्यास मदत मिळेल. या मार्गाचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. मागील रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी केवळ 50 कोटींची तरतूद करण्यात आली. यावर्षी केंद्र सरकारने 200 कोटी व राज्य सरकारने 200 कोटी रुपयांची तरतूद या कामासाठी करावी, अशी मागणी खासदार गांधी यांनी केली.

नगर-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. हे काम तातडीने मार्गी लागण्यासाठी सर्व संसदीय मार्ग वापरूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ब्रिटिश राजवटीत 1910 मध्ये बेलापूर-नेवासे-शेवगाव-गेवराई या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. शंभर वर्षांचा कालावधी उलटूनही रेल्वे मंत्रालयाने या कामाला हात लावलेला नाही. नगर-कल्याण रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे धूळ खात पडला आहे. मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर र्शीगोंदे तालुक्यात चार व राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. नगरहून जाणार्‍या सर्व साई एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करावी, तसेच दौंड-मनमाड मार्गावरील सर्व गाड्यांना नगरला थांबा द्यावा, आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूरला तिकीट बुकिंग काउंटर सुरू करावे व कुंभमेळ्याची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर, नगर, मनमाड व नाशिक या मार्गावर विशेष रेल्वे सोडाव्यात, नगर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर तिकीट खिडकी व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार गांधी यांनी केली.

उपमहापौर गीतांजली काळे, सुवेंद्र गांधी, सुनील रामदासी, र्शीकांत साठे, शिवाजी शेलार, अनिल गट्टाणी, अनंत जोशी, नितीन शेलार, मालन ढोणे, मनेश साठे, संग्राम म्हस्के, सुनील पंडित, दिलीप भालसिंग, बाबासाहेब गायकवाड, रामचंद्र खंडाळे, नंदकुमार कोकाटे यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

खासदार गांधी यांनी महिनाभरापूर्वीच या आंदोलनाची नोटीस रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस व कोतवाली पोलिसांनी आंदोलनाच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.