आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुक उमेदवारांची रस्त्यांवर झुंडशाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या उमेदवारीसाठी मुलाखत द्यायचीय? तुमची ताकद पहिल्याच दिवशी दिसली पाहिजे! पैसे देऊन आणलेले किमान शे-पाचशे लोक, पक्षाचे झेंडे लावलेल्या शंभर एक रिक्षा, बेंजो पार्टी किंवा ढोलताशांचे पथक, अन ‘हवेत तरंगत’ असलेले कार्यकर्ते, असा लवाजमा पक्ष कार्यालयावर न्या..असा ‘फॉर्म्युला’ नगरच्या इच्छुकांनी रूढ केला. मात्र, या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने नगरचे अरुंद रस्ते अडवून सामान्य नागरिकांचा अक्षरश: छळवाद मांडला गेला. नेते व असे कार्यकर्ते, दोघांनीही नागरिकांच्या त्रासाबद्दल बेपर्वाईचा कळस गाठल्याने शहराच दिवसभर सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. छोटे-मोठे वाहन तर सोडाच, पण इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पायी चालणेही अवघड केले.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर जनतेच्या सेवेसाठी कोण किती व कोणते दिवे लावतो, हे नगरकरांचा चांगले माहिती आहे. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. एकदा निवडणूक झाली, की नागरिकांच्या राशीला कायम त्रास असतो. किमान निवडणुकीपुरते तरी हा त्रास होणार नाही, अशी नागरिकांना असलेली अपेक्षा यावेळी सुरुवातीसच फोल ठरली आहे. सुरुवातच अशी, तर पुढे काय, या विचारांनी नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. शक्तिप्रदर्शनाच्या नावाखाली इच्छुक उमेदवारांना शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या लालटाकी ते दिल्ली दरवाजा, चितळे रस्ता, अमरधाम मार्गे नवीन टिळक रस्ता, पुणे रस्ता या रस्त्यांवर झुंडशाहीचे प्रदर्शन केले.
सुदैवाने, शाळा व महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या असल्याने विद्यार्थी घरी होते. सर्वांत मोठय़ा प्रमाणावर शक्तिप्रदर्शन मनसे व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यात मनसेच्या मुलाखती सर्वाधिक वर्दळीच्या दिल्ली दरवाजा परिसरात होत्या. तेथे शक्तिप्रदर्शन करत आलेल्या इच्छुकांनी आपली वाहने थेट रस्त्यावरच लावली. हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंदी असलेला असला, तरी ट्रकही नेहमी घुसत असल्याने येथे कायमच गर्दी असते. ऐन कोपर्‍यावरच उमेदवारांच्या रिक्षा उभ्या राहिल्याने तेथून अर्धा किलोमीटर रस्ता कापण्यासाठी नागरिकांना अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. हा प्रकार रात्रीपर्यंत सुरू होता. शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती चितळे रस्त्यावर होत्या. तेथेही प्रचंड गर्दी होती. त्यामुळे नागरिकांना दुचाकीसुद्धा चालवणे अवघड झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी कायनेटिक चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी दुचाक्यांवर झेडे लावून मिरवले. त्यांनी थेट पुणे महामार्गच अडवला.
सेनेकडून 82 जणांच्या मुलाखती
चितळेरस्त्यावरील जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेच्या 82 जणांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुलाखती दिल्या. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी झालेल्या 97 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.

इच्छुकांबरोबर नेतेही बेपर्वा
शक्तिप्रदर्शनामुळे सामान्य नागरिकांना होणार्‍या त्रासाचा कोणीही विचार केला नाही. विशेष म्हणजे, झुंडशाही करणार्‍यांना नेत्यांनी समज दिली नाही. त्यामुळे शहरातील समस्यांबाबत व नागरिकांच्या अडचणींबाबत या नेत्यांना किती आस्था आहे, हेही यानिमित्ताने उघड झाले.
पोलिसांकडूनही दुर्लक्ष..
पोलिसांसमोर टेंपोंतून कार्यकर्ते आणण्यात येत असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दिल्लीगेट परिसरात झालेल्या कोंडीकडे पोलिस हताशपणे बघत होते. त्यामुळ दिल्लीगेटच्या आत, अमरधामच्या बाजूला व लालटाकीच्या बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
काँग्रेसचे उमेदवार शांत..
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे दोन मंत्री मुलाखतीसाठी शहरात होते. काँग्रेस इच्छुकांनी मात्र शक्तिप्रदर्शन टाळले. त्यामुळे शहर काँग्रेस कार्यालयासमोर तशी गर्दी कमी होती.
हा सर्व बेशरमपणा..
निवडणुकीसाठी विकतचे कार्यकर्ते घेऊन धुडगूस घालत मुलाखतीसाठी येणार्‍यांना लोकशाहीचा अर्थच समजलेला नाही. आज माझी परीक्षा होती, पण महाविद्यालय परिसरात वाद्यांचा गोंगाट सुरू होता. सामान्यांच्या सुख-दु:खाशी देणेघेणे नसलेले हे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणार आहेत. हा सर्व बेशरमपणा आहे. जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.’’ आशिष सूर्यवंशी, महाविद्यालयीन विद्यार्थी.