आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar AMC Election Congress And NCP Manifesto Published

आघाडीकडून शिळ्या कढीला ऊत; युतीची काही विकासकामे चोरली..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जाहीरनाम्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरकरांसाठी अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी संयुक्त जाहीरनामा प्रसिध्द केला. जाहीरनाम्यात नगरकरांना पूर्वीप्रमाणेच मोठी स्वप्ने दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे आघाडीचा हा जाहीरनामा म्हणजे ‘शिळ्या कढीला उत’ असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे युतीने केलेली काही विकासकामे चोरण्याचा प्रयत्नही जाहीरनाम्यात झाला आहे. त्यामुळे आता युतीचा जाहीरनामा कसा असेल, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सहा दिवसांनी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला गती दिली आहे. उमेदवारांनी आपले वैयक्तिक जाहीरनामे प्रभागातील जनतेसमोर मांडले आहेत. मात्र, शहर विकासासाठी कोणता पक्ष काय करणार, याची उत्सुकता नगरकरांना आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी चार दिवस अभ्यास करून शहर विकासाचा जाहीरनामा जनतेसमोर मांडला. त्यात शहराच्या भल्यासाठी दोन्ही पक्ष कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय नगरकरांना मोठी स्वप्ने दाखवण्यात आली आहेत. जाहीरनाम्यातील ‘आघाडी संकल्प’ वाचला, तर ही महापालिका निवडणूक नसून विधानसभेची निवडणूक आहे का, असा प्रश्न पडतो. जाहीरनाम्याच्या प्रस्तावनेत नगर शहर हे मोठे खेडे म्हणून ओळखले जाते. शहराला मागील 30 वर्षांत बरेच काही भोगावे लागले (आमदार अनिल राठोड यांच्यामुळे), आजूबाजूची शहरे कशी विकासाची घोडदौड करत आहेत, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आघाडीची सत्ता असताना केंद्र व राज्य शासनाकडून कसा निधी आणला, हे जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे.
शहर सुधारित पाणीपुरवठा योजना (फेज 1), नगरोत्थान योजना, पथदिवे, शहर बससेवा, गंगा उद्यान या कामांचे र्शेय आघाडीने घेतले आहे. मात्र, गंगा उद्यान वगळता इतर कामांसाठी निधी मिळवण्याकरिता युतीच्या काळात पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे या कामांना गती मिळाली. सत्तेवर आल्यानंतर काय करणार, यासाठी जाहीरनाम्यात 20-25 आश्वासने देण्यात आली आहेत. परंतु त्यातील निम्म्यापैकी जास्त आश्वासने फोल ठरणार आहेत. कारण या आश्वासनांचा व महापालिकेचा कोणताही संबंध नाही.
बबनराव पाचपुते हद्दपार
जाहीरनाम्यावरील फोटोंमधून आमदार बबनराव पाचपुते यांना हद्दपार करण्यात आले आहे. पालकमंत्री असताना त्यांनी शहरात बर्‍यापैकी लक्ष घालत वेळही दिला होता. त्यांच्या मागेपुढे फिरणार्‍या स्वपक्षाच्या व इतर पक्षांच्या नेत्यांची संख्या मोठी होती. मात्र, पद गेल्यानंतर शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानी त्यांना महापालिका निवडणुकीपासून दूर ठेवले आहे.
आयात केलेले फोटो
जाहीरनाम्यातील विकासकामांचे 80 टक्के फोटो नगरमधील नाहीत. पथदिवे, पाणी योजना, रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे फोटो बाहेरून आयात केलेले आहेत. दृष्टीपथातील विकासकामांच्या बारा फोटोंचा नगरशी काहीही संबंध नाही. महापालिका स्थापन झाल्यानंतर पाच वष्रे सत्ता आघाडीच्या ताब्यात होती. किमान फोटोत देण्यासाठी विकासकामे आघाडीला शोधता आली नाहीत.
युतीने काहीच केले नाही
आघाडीच्या काळात लालटाकी ते नेप्तीनाक्यापर्यंतचा रस्ता तयार झाला. संदीप कोतकर यांच्या काळात शॉपिंग सेंटर, संग्राम जगताप यांच्या काळात पाणी योजना आणली. आघाडी सत्तेवर आल्यानंतर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम आम्ही केले. युतीने काहीच केले नाही. त्यांनी केवळ फूट पाडण्याचे काम केले.’’ दादा कळमकर, राष्ट्रवादी
ही आहेत आश्वासने
एमआयडीसाचे विस्तारीकरण
रोजगार व स्वयंरोजगारात वाढ
उच्च् व व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करणार
आयटी पार्क कार्यान्वित करणार
ऐतिहासिक, धार्मिकस्थळांचा पर्यटन विकास करणार
अद्ययावत सांस्कृतिक भवन व नाट्यगृह बांधणार
खड्डेमुक्त नगरचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार
क्रीडांगणे विकसित करून प्रशिक्षण सुविधा
महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधणार
उड्डाणपूल व पार्किंगची सुविधा
असंघटित कामगारांसाठी घरकुले
ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान व विरंगुळा केंद्र उभारणार
अद्ययावत उद्याने व भाजी मंडई
धार्मिक स्थळांचे जतन व विकास
घनकचर्‍याची योग्य विल्हेवाट
निधी आणून भ्रष्टाचारमुक्त विकास,
उपनगरांत प्रसुतीगृह आरोग्य केंद्र
केडगाव, सारसनगर व सावेडीत ड्रेनेजलाइन टाकणार
सावेडी उपनगरासाठी स्मशानभूमी
शासनाच्या मदतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजना रावणार
प्रशासकीय कामात ई-गव्हर्नन्स