आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाबे दणाणले : बिनविरोध जागेवरही ‘नोटा’चा अधिकार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्या जागांवर बिनविरोध निवडणूक होईल, अशा ठिकाणी मतदारांना नकाराधिकार (नोटा) वापरता येईल की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सत्यनारायण यांच्या या माहितीमुळे बिनविरोध निवडून आलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सत्यनारायण यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना नकाराधिकार वापरण्यासाठी मतदान यंत्रावर ‘नोटा’ बटणाचा पर्याय प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिला आहे. राज्यात प्रथमच नगर महापालिका निवडणुकीत हा नकाराधिकार वापरण्यात येत आहे. परंतु ज्या जागांवर बिनविरोध निवडणूक होईल, तेथे मतदारांना हा अधिकार वापरता येईल का, असा प्रश्न पत्रकारांनी सत्यनारायण यांच्यासमोर उपस्थित केला. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सत्यनारायण यांनी स्पष्ट केले.
ज्या मतदारांचे मतदारयादीत फोटो नाहीत, अशांसाठी काही मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर फोटो काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदारांचे ओळखपत्र परिपूर्ण असावे, या उद्देशाने राज्यात प्रथमच नगरमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेत अडथळा न येता खासगी कंपनीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे काही मतदान केंद्रावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ज्यांचे मतदारयादीत फोटो नसतील, अशा मतदारांना मतदान झाल्यानंतरही फोटो काढता येणार आहेत. मतदारांकडे परिपूर्ण ओळखपत्र असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरावे, असा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्याचे सत्यनारायण यांनी यावेळी सांगितले.
निकालावर ‘नोटा’चा परिणाम होणार नाही..
सर्वोच्च् न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदारांना नकाराधिकार (नोटा) मिळाला आहे. मतमोजणीच्या वेळी नकाराधिकाराची मते जाहीर करण्यात येतील, परंतु त्यांचा निवडणूक निकालावर परिणाम होणार नाही. निवडणुकीच्या दिवशीच काही प्रभागांचा प्रायोगिक तत्त्वावर निकाल जाहीर करता येणे शक्य आहे, परंतु आयुक्त विजय कुलकर्णी व जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे सुरक्षेच्या दृष्टीने त्यास तयार नसल्याचे सत्यनारायण यांनी स्पष्ट केले.
52 मतदान केंद्रे संवेदनशील
महापालिका निवडणुकीसाठी एकूण 283 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 52 केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे यांनी दिली. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात उपप्रादेशिक परिवहनमार्फत 42, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17, तर आचारसंहिता कक्षाकडून एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख संतोष भोर यांनी यावेळी दिली.