आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेड न्यूज’साठी 12 सदस्यीय समिती गठीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘पेड न्यूज’बाबत आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी महापालिकास्तरावर शनिवारी समिती गठीत करण्यात आली. आचारसंहिता लागू होऊन आठ दिवस उलटले, तरी मनपा प्रशासनाने समिती गठीत केली नव्हती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिध्द करताच, खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दुसर्‍याच दिवशी ही समिती गठीत केली.
महापालिका निवडणुकीसाठी 15 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आठ दिवसांपूर्वी आचासंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या 16 जानेवारी 2012 च्या आदेशानुसार काही उमेदवार व राजकीय पक्ष निवडणुकीत बातम्यांच्या माध्यमातून जाहिरात करतात. जाहिरातीचे दृश्य स्वरूप जरी बातमीसारखे असले, तरी प्रत्यक्षात मात्र प्रसारमाध्यमांना पैसे देऊन अशा बातम्या छापल्या जातात, यालाच ‘पेड न्यूज’ म्हणतात. या‘पेड न्यूज’बाबत आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. आचारसंहिता जाहीर होताच ही समिती गठीत करणे आवश्यक होते, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
‘दिव्य मराठी’ने याबाबत शुक्रवारच्या (15 नोव्हेंबर) अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जागे झालेल्या मनपा प्रशासनाने दुसर्‍या दिवशी ही समिती स्थापन केली. आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीमध्ये 12 सदस्यांचा समावेश आहे.
या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. पी. पी. देवरे, ज्योती कावरे आदींचा समावेश आहे.