आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी : अंतर्गत वादाने दुभंगली शिवसेना-भाजप युती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला लागलेले ग्रहण अजून सुटलेले नाही. भाजपकडून युती अभेद्य असल्याचे सांगण्यात येत असताना शिवसेनेने मात्र भाजपच्या ‘त्या’ 11 उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच शिवसेना व भाजपने पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारपत्रिकेमधून एकमेकांच्या राष्ट्रीय नेत्यांचे फोटो व नावे हटवल्याने पाच वर्षे एकत्र नांदलेल्या युतीमधील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीत चव्हाट्यावर आला आहे.
महापालिका स्थापनेपासून शिवसेना व भाजपची युती आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही सेना-भाजपने युती करून निवडणूक लढवली होती. मात्र, आता युतीला अंतर्गत वादाचे ग्रहण लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून सेना-भाजपमध्ये जागावाटप व युतीवरून ‘तू तू, मैं मैं’ सुरू होते. मतदान अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपले असताना युतीचा घोळ अजूनही संपलेला नाही. दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी युती नकोच, असे स्पष्टपणे सांगत असताना दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते मात्र युती ठेवण्याबाबत अनुकूल आहेत.
भाजपने उमेदवार आयात करून प्रभागात उभे केल्याचा आरोप आमदार अनिल राठोड यांनी करून या 11 उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यानंतर भाजपनेही तीन उमेदवारांना पुरस्कृत करून प्रचाराला प्रारंभ केला. यामुळे वाद आणखी चिघळला आहे. पुन्हा पुढची पाच वर्षे सत्ता मिळवण्यासाठी सेना-भाजपचे नेते सरसावले आहेत, पण निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीसाठी एकत्र येण्यास तयार नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांना काडीमोड करावा लागला.
शिवसेना-भाजप या दोघा पक्षाच्या नेत्यांनी त्यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवारांचा स्वतंत्रपणे प्रचार सुरू केला असून, दोन्ही पक्षांनी आपल्या प्रचारपत्रक व फलकांवरून मित्रपक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबर राष्ट्रीय नेत्यांची नावेही काढली आहेत. त्यामुळे वाद आणखी चिघळला आहे.
आता हे दोन्ही मित्रपक्ष आमने-सामने उभे राहिले आहेत. युतीत झालेल्या काडीमोडाचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्षांना होण्याची चिन्हे आहेत.
मतभेद,तरीही युती शाबूत..
राष्ट्रीय व राज्यस्तरासह नगरमध्येही युती आहेच. दोन्ही पक्षांत एखाद्या विषयावर मतभेद असले, तरी युती कायम राहील. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची युती राहावी, अशी प्रामाणिक इच्छा आहे. आमची शिवसेनेबरोबर सकारात्मक चर्चा सुरू आहे. आम्ही युती करूनच ही निवडणूक लढवणार आहोत.’’ दिलीप गांधी, खासदार, पंच कमेटी सदस्य.