आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतावीळांनी बांधले गुडघ्याला बाशिंग, उमेदवारीपूर्वीच पत्रके वाटून प्रचाराचा प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नवीन प्रभागरचना जाहीर होताच इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. अनेकांनी तर आपल्या प्रभागात पत्रके वाटून प्रचाराचा नारळही फोडला आहे. नवीन प्रभागाची नकाशासह माहिती, तसेच स्वत:चा अजेंडा पत्रकाद्वारे मतदारांसमोर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात काही विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणूक तीन महिन्यांनंतर होणार असली, तरी प्रचाराची रणधुमाळी मात्र आतापासूनच सुरू झाली आहे.

‘आपला हक्काचा माणूस..आपल्या विकासासाठी’ हा अजेंडा आहे एका इच्छुक उमेदवाराचा..केवळ अजेंडाच नाही, तर प्रभागाची इत्यंभूत माहिती देखील प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी या उमेदवाराने पत्रके वाटण्याची शक्कल लढवली आहे. या उमेदवाराप्रमाणेच इतर प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी देखील पत्रके वाटण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. त्यात काही विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. नवीन प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपल्या प्रभागात कोणत्या भागाचा समावेश आहे, याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे, या माहितीबरोबरच स्वत:चा अजेंडाही मतदारांना कळावा, यासाठी इच्छुक उमेदवारांनी ही शक्कल लढवली आहे. विशेष म्हणजे द्विसदस्यीय पध्दतीनुसार 65 वॉर्डांचे 34 प्रभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून मोठय़ा प्रमाणात हरकती येतील, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचना तयार करण्यात आली असून उगाच हरकती घेण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या प्रभागात लक्ष दिलेलेच बरे, अशी विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांची धारणा झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला पाच दिवसांत केवळ 117 हरकती मिळाल्या आहेत. एकीकडे हरकतींचे प्रमाण कमी असल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला, तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत.

मतदारांना आतापासूनच आकर्षित करण्यासाठी पत्रके वाटून त्यावर प्रभाचा नकाशा, प्रभागातील भागांची नावे, लोकसंख्या, आरक्षण, इच्छुक उमेदवाराचे छायाचित्र, तसेच निवडणूक लढवण्यासाठी स्वत:चा अजेंडा अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. पत्रके वाटण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले असून त्यांच्यामार्फत प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पत्रक पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेवरील हरकतींची सुनावणी, प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर करणे, त्यावर पुन्हा हरकती मागवणे, तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, यासाठी बराच कालावधी लागणार आहे. मात्र, तोपर्यंत स्वस्थ बसणे इच्छुक उमेदवारांना न परवडणारे आहे. त्यामुळे त्यांनी पत्रके वाटून आतापासूनच प्रचाराचा नारळ फोडला आहे.

टपर्‍यांवर पत्रकांची सक्ती
एका विद्यमान नगरसेवकाने सुरू केलेली पत्रके वाटण्याची शक्कल अनेकांना आवडली, त्यामुळे चहाची टपरी, पानटपरी, वडापावची गाडी, सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांचा अजेंडा असलेले पत्रके पहायला मिळतात. केडगावमधील काही चहाच्या टपर्‍यांवर तर पत्रकांचे वाटप करणे सक्तीचे करण्यात आले आहे. चहा पिऊन झाल्यावर संबंधित टपरीचालक ग्राहकाच्या हातात पत्रक ठेवतो. पत्रकांचे वाटप न केल्यास या टपरीचालकांना इच्छुक उमेदवार व त्याच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे.

माहितीसाठी पत्रकांचे वाटप
आपण कोणत्या प्रभागात राहतो, कोणता भाग प्रभागात आहे, प्रभागाची लोकसंख्या, आरक्षण ही सर्व माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रभागरचना जाहीर होताच दुसर्‍या दिवशी नागरिकांना प्रभागाबाबत पत्रके वाटून माहिती दिली. अनेक विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांना ही संकल्पना आवडली, तसेच नागरिकांनीही त्याचे स्वागत केले. निवडणुकीसाठी तीन महिने वेळ आहे. त्यामुळे प्रचारासाठी नव्हे, तर नागरिकांच्या माहितीसाठी पत्रके वाटली.’’ गणेश भोसले, नगरसेवक.

गुंतागुंतीची प्रभागरचना
नवीन प्रभागरचनेनुसार एक प्रभाग जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांबीचा झाला आहे. प्रत्येक प्रभागात लोकसंख्या मोठी असली, तरी मतदार मात्र कमी आहेत. त्यात काही मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे निवडणूक तीन महिन्यांनंतर होणार असली, तरी आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रभागाची माहिती पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.’’ संपत बारस्कर, इच्छुक उमेदवार.

महापालिका कार्यालयात सामसूम
प्रभागरचना व आरक्षण सोडत कधी जाहीर होईल, हे विचारण्यासाठी महिनाभरापूर्वी आयुक्त-उपायुक्तांच्या दालनात गर्दी करणारे विद्यमान नगरसेवक सध्या मात्र महापालिका कार्यालयात फिरकायला तयार नाहीत. प्रभागरचना जाहीर होताच प्रत्येकजण उमेदवारीचे गणितं जुळवण्यात मग्न झाला आहे. महापौर व उपमहापौर वगळता अन्य पदाधिकार्‍यांनी देखील मनपाकडे पाठ फिरवली आहे.