आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar AMC Rain Water And Drainage Managment Fail

आपत्कालीन व्यवस्थापन नावालाच, महापालिका प्रशासनासह महावितरणचेही दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वादळी वार्‍यासह शनिवारी (8 जून) सायंकाळी झालेल्या पावसाने शहरातील विविध भागात दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. लालटाकी परिसरात घरावरचे पत्रे उडाले, तर शहराच्या बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला. एवढे होऊनही महावितरणसह महापालिका ढिम्म आहे. आपत्कालिन व्यवस्थापन केवळ नावालाच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पावसाळ्याआधी मनपातर्फे दरवर्षी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात येतो. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागातील काही कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येते. यावर्षी आराखडा तयार करण्यात आला, परंतु तो केवळ कागदावरच आहे. महापालिकेबरोबरच महावितरणच्या आपत्कालिन व्यवस्थापनाचेही पितळ पावसात उघडे पडले आहे. शहरात शनिवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास वादळ-वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याने सावेडी परिसरातील गुलमोहर रस्ता, र्शमिकनगर, बिशप लॉईड कॉलनी, तसेच सिध्दार्थनगर, लालटाकी, जिल्हा रुग्णालय, प्रेमदान हडको, रासनेनगर, एमआयडीसी, आरटीओ कार्यालय आदी भागात झाडे कोसळली. लालटाकी परिसरातील बारस्कर कॉलनीत एका घरावर झाड पडले. याच परिसरात एका घराचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. सिध्दार्थनगरसह अनेक ठिकाणी विजेच्या तारा व खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. भारनियमनामुळे शनिवारी दिवसभर वीजपुरवठा बंद होता. नंतर सायंकाळी पाऊस झाल्याने अनेक भागातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झालाच नाही. काही ठिकाणी रात्री पाऊस बंद झाल्यानंतर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. पडलेली अनेक झाडे दुसर्‍या दिवशी तशीच होती. नगरसेवकांच्या दबावानंतर काही ठरावीक ठिकाणची झाडे हटवण्यात आली. मनपाप्रमाणेच महावितरणने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना उशिरा सुरूवात केली. विजेच्या तारांना अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या तोडणे, वाकलेले खांब बदलणे, खाली आलेल्या तारा बदलणे, डीपीला झाकणे बसवणे, खराब वायरींगची दुरूस्ती करणे यासारखी कामे 7 जूनपूर्वी करणे आवश्यक होते. परंतु ही कामे न झाल्याने पावसात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लोकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे.

70 टक्के नालेसफाई
नालेसफाईचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सीना नदीपात्राची सफाई करण्यात आली आहे. नागापूर, बोल्हेगाव, निर्मलनगर, पाइपलाइन रोड, सिव्हील हडको आदी ठिकाणच्या नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. दोन जेसीबी व पाच पोकलेन मशीनच्या साहाय्याने उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.’’ सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख

कार्यवाही सुरू
शनिवारी झालेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडे पडली. नगरसेवक व नागरिकांचे फोन येताच पडलेली झाडे तातडीने हटवण्यात आली. आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी मनपाकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले असून सर्व कर्मचारी आपत्तीच्यावेळी तत्पर हजर राहतील.’’ आर. जी. सातपुते, आपत्कालिन व्यवस्थापन प्रमुख, मनपा

भामरे म्हणतात ‘आता नको, सकाळी बोलू’
नगरमधील विविध भागांत शनिवारी रात्री व रविवारी वीजपुरवठा खंडित होता. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी ‘आता नको, सकाळी बोलू’ असे म्हणत उत्तर देण्यास नकार दिला. महावितरण किती गंभीर आहे, हे यातून स्पष्ट झाले.