आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे सौभाग्य सदन बनले गायींचा गोठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जारच्या महापालिका स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत उभे करत असताना नगर महापालिका आहे ते स्त्रोत टिकवण्याचे साधे प्रयत्नही करत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. माळीवाड्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेले मनपाच्या मालकीचे मंगल कार्यालय गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मंगल कार्यालयाचा गोठा बनला असून मनपाच्या मालकीच्या इतर चार मंगल कार्यालयांची परिस्थिती काही वेगळी नाही.

केवळ शासकीय अनुदानावर विकासकामांची कसरत सुरू आहे. महापालिकेच्या मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचा उपयोग उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून करता येणे शक्य आहे. मात्र, या शाश्वत उत्पन्नाकडे महापालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळेच मनपाच्या जागांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. मनपाच्या मालकीची पाच मंगल कार्यालये आहेत. शहराच्या मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी ही मंगल कार्यालये आहेत. यातील तीन मंगल कार्यालये मनपा प्रशासन स्वत: चालवत आहे, तर एक पुरुष बचतगटाला चालवायला दिले असून एक बंद स्थितीत आहे.

माळीवाडा परिसरातील 1960 साली बांधलेल्या ‘सौभाग्य सदन’ या मंगल कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले होते. गोरगरीब लोकांना माफक दरात मंगल कार्यालय उपलब्ध व्हावे व यातून तत्कालीन नगरपालिकेला उत्पन्न मिळावे, असा उद्देश त्यामागे होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हे मंगल कार्यालय बंद आहे. स्थानिक लोकांनी जनावरे बांधण्यासाठी या मंगल कार्यालयाचा उपयोग सुरू केला असल्याने या ठिकाणाला गोठय़ाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विजेची वायर व पंखे तोडून टाकण्यात आले आहेत. रिकाम्या पडलेल्या या जागेचा रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय व तळीरामांकडून वापर सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

अन्य मंगल कार्यालयेही दुरवस्थेच्या विळख्यात

मनपाच्या पाचपैकी केडगाव येथील भाग्योदय, नालेगाव येथील शिवपवन हे मनपातर्फे चालवले जातात. रंगारगल्लीतील डॉ. महाले मंगल कार्यालय शिववरद पुरुष बचतगटाला चालवायला दिले आहे, तर नवीन टिळक रस्त्यावरील आंबेडकर स्मारक मनपाकडून चालवले जाते. लग्नाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी हे भाड्याने देण्यात येते. या सर्व वास्तूंची डागडूजी होणे गरजेचे आहे.

अवैध व्यवसायाचा अड्डा
इमारत रिकामी असल्याने दिवसा व रात्रीही दारुड्यांचा अड्डा येथे जमत आहे. रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसायासाठी या इमारतीचा उपयोग होत आहे. अनेकदा संबंधितांना रंगेहाथ पकडले आहे. या अवैध उद्योगांचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे खाली असलेल्या या इमारतीत जनावरे बांधून राखण करत आहोत. यातून येथे चालणार्‍या अवैध उद्योगांवर आपसूक नियंत्रण आले. मनपाने हे मंगल कार्यालय सुरू करावे.’’ दत्तात्रेय औशीकर, नागरिक.

प्रशासन जबाबदार
सौभाग्य सदन हे मंगल कार्यालय खासगीकरणातून सुरू करावे किंवा मनपाने डागडुजी करून वापरायोग्य बनवावे. या मागणीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा अनेकदा लावून धरला. पण कार्यवाही होत नाही. इमारतीच्या दुरवस्थेचा आजूबाजूच्या नागरिकांनाही मोठा त्रास होत आहे. प्रशासन कोणतीही कार्यवाही करायला तयार नाही. या दुरवस्थेला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार आहे.’’ बाळासाहेब बोराटे, नगरसेवक.